पांचगणी न्यूज नेटवर्क
सातारा : सह्याद्रीच्या कडेकपारीत वसलेल्या जावळी तालुक्यात बेकायदा दारूविक्री आणि विषारी हातभट्टी दारूच्या निर्मितीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंगळवारी एकाच दिवशी संपूर्ण तालुका पिंजून काढत पथकाने ८ वेगवेगळ्या गावांमध्ये अचानक छापे टाकले. या धडक कारवाईत ८ जणांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले असून, मोठ्या प्रमाणावर देशी दारू आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विभागाच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे जिल्ह्यातील अवैध दारूमाफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
जावळीतील निसर्गरम्य आणि दुर्गम भागाचा फायदा घेत काही घटकांकडून अवैध दारू निर्मिती व वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी उत्पादन शुल्क विभागाकडे येत होत्या. यावर कायमचा अंकुश लावण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम आखण्यात आली. भरारी पथक सातारा आणि वाई-महाबळेश्वर विभागाच्या संयुक्त पथकाने मंगळवारी भल्या पहाटे बिभवी, मेढा, सोमर्डी, करहर, सोनगाव आणि आनेवाडी या परिसरात एकाच वेळी धडक कारवाया सुरू केल्या.
या छाप्यात बिभवी येथून आकाश विठ्ठल आगलावे, मेढा येथून मयूरेश सुरेश गोरे व गणेश विष्णू धनावडे, सोमर्डी येथून निरंजन साहेबराव परामणे, करहर येथून दीपाली रमेश गोळे व संभाजी रामचंद्र गोळे, सोनगाव येथून दीपक संजय शेवते आणि आनेवाडी येथून अनिल मुगुटराव फरांदे यांच्यावर गुन्हे दाखल करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गेल्या नऊ महिन्यांची आकडेवारी पाहिली तर उत्पादन शुल्क विभागाने जावळी तालुक्यात अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले आहे. या कालावधीत तब्बल ४० छापे टाकून तब्बल २३ लाख ८० हजार रुपयांचा साठा व वाहने जप्त करण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या आणि कुटुंबांची राखरांगोळी करणाऱ्या या अवैध धंद्यांविरुद्ध सुरू झालेली ही धडक मोहीम यापुढेही अशीच सुरुच राहील, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
या कारवाईत निरीक्षक माधव चव्हाण, राजेश कोळी, दुय्यम निरीक्षक विजय मरोड, अमित जगताप, नीता पाटील, नितीन जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. दरम्यान, जिल्ह्यात कुठेही बनावट वा हातभट्टी दारूची विक्री-वाहतूक होत असल्यास नागरिकांनी तत्काळ १८००२३३९९९९ या टोल फ्री अथवा ८४२२००११३३ या व्हॉट्सॲप क्रमांकावर माहिती द्यावी, बातमीदाराचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांनी केले आहे.



