Home » जावळी » जावळी तालुक्यातील दापवडी येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालक आक्रमक; शाळेसमोर बस थांब्याची मागणी, मेढा आगार प्रमुखांना निवेदन

जावळी तालुक्यातील दापवडी येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालक आक्रमक; शाळेसमोर बस थांब्याची मागणी, मेढा आगार प्रमुखांना निवेदन

पांचगणी न्यूज नेटवर्क

​दापवडी : जावळी तालुक्यातील दापवडी येथील दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना एसटी प्रवासासाठी करावी लागणारी पायपीट आणि कसरत थांबवण्यासाठी आता पालक वर्ग आक्रमक झाला आहे. शाळेसमोर नवीन बस थांबा मंजूर करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शाळा प्रशासन आणि पालकांच्या वतीने मेढा आगार प्रमुखांना नुकतेच एक सविस्तर निवेदन देण्यात आले. या गंभीर समस्येची दखल घेत जावळी पंचायत समितीचे उपसभापती गोरख महाडिक यांनीही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी एसटी महामंडळाकडे तातडीने पाठपुरावा सुरू केला आहे.

 

​पाचगणी – करहर या मुख्य मार्गावर दापवडी हा मुख्य थांबा असून, त्याच्या पुढील अंतरावर वहागाव हा बस थांबा आहे. मात्र, या दोन थांब्यांच्या अगदी मधोमध श्री दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालय आहे. या हायस्कूलमध्ये परिसरातील अनेक गावांमधून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, ज्यामध्ये प्रामुख्याने मुलींची संख्या मोठी आहे. शाळा सुटल्यानंतर हक्काची एसटी गाडी पकडण्यासाठी या विद्यार्थ्यांना दापवडी किंवा वहागाव या दोन्ही थांब्यांवर धावपळ करत जावे लागते. यामध्ये विद्यार्थ्यांची मोठी दमछाक होत असून, मुख्य रस्त्यावरून जाताना त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

 

​वहागाव थांब्याऐवजी हायस्कूलसमोर थांबा देण्याची मागणी

पालकांनी निवेदनात एक अत्यंत व्यावहारिक पर्याय सुचवला आहे. वहागाव येथील बस थांब्यावर सध्या प्रवाशांची संख्या नगण्य असते, तिथून फारसे कोणीही प्रवास करत नाही. त्यामुळे तो निरुपयोगी ठरत असलेला थांबा थेट हायस्कूलच्या समोर शिफ्ट (स्थलांतरित) करण्यात यावा. यामुळे शासनाचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही आणि शेकडो विद्यार्थिनींना शाळेच्या दारातच सुरक्षितपणे एसटी बस उपलब्ध होऊ शकेल.

 

​मुलींना सुरक्षित घरी पोहोचवणे ही आपली जबाबदारी : उपसभापती गोरख महाडिक

या संवेदनशील विषयावर जावळीचे उपसभापती गोरख महाडिक यांनी पालकांना पूर्ण पाठबळ दिले आहे. त्यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण देताना त्यांच्या प्रवासाची कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. त्या मुलींना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवणे ही समाजातील आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. या विषयाचे गांभीर्य ओळखून पंचायत समितीच्या वतीने आम्ही तात्काळ पावले उचलली असून, एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली आहे. दापवडी हायस्कूलसमोरील थांब्याबाबत लवकरच अधिकृत आणि ठोस कार्यवाही केली जाईल.”

​शाळेसमोरील या थांब्याला मंजुरी मिळेपर्यंत आणि एसटी प्रत्यक्ष थांबण्यास सुरुवात होईपर्यंत या लढ्यात पालकांसोबत ठामपणे उभे राहण्याचा निर्धार लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. आता मेढा आगार प्रशासन यावर किती जलद गतीने निर्णय घेते, याकडे संपूर्ण जावळी तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers