Home » मेढा » जावळी तालुक्यात विविध उपक्रमांनी सहकार सप्ताह साजरा

जावळी तालुक्यात विविध उपक्रमांनी सहकार सप्ताह साजरा

पांचगणी न्यूज नेटवर्क

मेढा :- सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात दरवर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिन (International Co-operative Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तालुक्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात सहकार क्षेत्राचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. वै. दत्तात्रय महाराज कळंबे,स्वर्गीय लालसिंगराव शिंदे (काका),स्वर्गीय राजेंद्र शिंदे यांनी सहकाराची पायाभरणी केली. सहकार सप्ताहात जावळी तालुक्यातील ५१ विकास सेवा सोसायट्या, खरेदी-विक्री संघ, आणि विविध पतसंस्थानी या कार्यक्रमात सक्रिय भाग घेतला होता . जावळी तालुक्यात प्राधान्याने जावळी सहकारी बँक, प्रतापगड सहकारी साखर कारखाना आणि कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) आणि विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या सहकार क्षेत्र मजबूत करत आहेत. या सहकार सप्ताहात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहकारी संस्था तसेच पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान केला .ज्या विकास सेवा सोसायट्याची सभासद पातळीवर 100 % व बँक पातळीवर 100 % वसुली झाली त्यांचा कार्यक्रमा दरम्यान सन्मान करणेत आला.

तसेच उपस्थित सभासदांना सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले .तालुक्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग व शेतीपूरक सुविधा मिळवून देण्यात सहकारी संस्थांचा मोठा वाटा आहे असे मत सहाय्यक निबंधक जगताप यांनी मांडले.

२९ जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीत केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला ५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल देशभरात विशेष “सहकार सप्ताह” साजरा केला जात आहे. याची मुख्य थीम ‘सहकार से समृद्धी’ (सहकारातून समृद्धी) अशी आहे. सहकार सप्ताहाचे प्रमुख म्हणजे सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना सहकारी संस्थांच्या फायद्यांविषयी जागरूक करणे.’सहकारातून समृद्धी’ या दृष्टिकोनातून ग्रामीण आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला गती देणे.सहकार क्षेत्रातील यशस्वी प्रकल्प, यशोगाथा आणि नवीन उपक्रमांचे प्रदर्शन करणे.समाजातील तळागाळातील घटकांना आत्मनिर्भर आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे.हेच खरे सहकाराचे उद्दिष्ट आहे

सहाय्यक निबंधक कार्यालय जावळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच गटसचिव संघटना जावली यांचे वतीने सहकार सप्ताह चे आयोजन केले होते

सहकार दिनाचे औचित्य साधून सोसायट्यांच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. केवळ संस्थात्मक विकासच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी म्हणून पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान सहाय्यक निबंधक सुनील जगताप आणि विभागीय विकास अधिकारी आर एल निकम, सहकार बोर्डाचे अधिकारी सुरवसे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. ग्रामीण भागाच्या आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासात सहकारी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. मेढा व संपूर्ण जावळी तालुक्यातील सहकार चळवळ अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याचा निर्धार सर्व उपस्थितांनी या वेळी व्यक्त केला.

 

तसेच सदर कार्यक्रमात सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जावळी या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी नितीनजी पवार हे सेवानिवृत्त झाले बद्दल त्यांचा समस्त जावळीकरांच्या वतीने सन्मान करण्यात आला

सदर कार्यक्रम प्रसंगी जावळी तालुक्याचे सहाय्यक निबंधक सुनील जी जगताप, विभागीय विकास अधिकारी आर एल निकम, सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अधिकारी अक्षय चव्हाण,सहकार बोर्डाचे अधिकारी श्री सुरवसे,विक्री अधिकारी, सर्व विकास अधिकारी तसेच तालुक्यातील सर्व सचिव बंधू उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत विकास अधिकारी दिपक पार्टे यांनी केले आभार प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामदास पार्टे यांनी मांनले

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers