Home » पांचगणी » ज्ञानगंगा हायस्कूलच्या पैलवानांची कुस्तीच्या आखाड्यात बाजी; तीन मल्लांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड!

ज्ञानगंगा हायस्कूलच्या पैलवानांची कुस्तीच्या आखाड्यात बाजी; तीन मल्लांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड!

 

​पाचगणी न्यूज नेटवर्क

पांचगणी : शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा क्षेत्रातही अव्वल असणाऱ्या पाचगणी येथील ज्ञानगंगा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत आपल्या ताकदीची व कौशल्याची छाप पाडत घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या तीन गुणवंत कुस्तीपटूंनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आपले तिकीट निश्चित केले आहे. त्यांच्या या यशामुळे पाचगणीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

​तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत ज्ञानगंगा हायस्कूलच्या मल्लांनी आखाड्यात प्रतिस्पर्ध्यांवर मात करत नेत्रदीपक यश मिळवले. इयत्ता नववीतील राशिद कुतुबुद्दीन नदाफ याने ६५ किलो वजनगटात आपल्या पकडी आणि डावांच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णयशाला गवसणी घातली. तर ७० किलो वजनगटात उमर फारूक मुजफ्फर नलबंद याने आणि ६८ किलो वजनगटात अदनान सलीम शेख याने अत्यंत चुरशीच्या लढतीत द्वितीय क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेतील आपले स्थान पक्के केले.

​विद्यार्थ्यांच्या या यशामागे प्रशिक्षक इकबाल डांगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत, शिस्त आणि विजयाची जिद्द यांच्या बळावरच या बालमल्लांनी आखाड्यात हे उल्लेखनीय यश खेचून आणले.

​क्रीडा क्षेत्रातील या शानदार कामगिरीबद्दल ज्ञानगंगा हायस्कूलचे प्राचार्य गणेश फरांदे यांनी विजयी कुस्तीपटूंचे विशेष अभिनंदन केले. तसेच संस्थेच्या अध्यक्षा नाझनीन डांगे, संचालक अशफाक खान आणि संचालक जयंत गंभीर यांनी तिन्ही गुणवंत विद्यार्थ्यांसह क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक इकबाल डांगे यांचे मनःपूर्वक कौतुक केले. ज्ञानगंगा हायस्कूलने नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले असून, हे कुस्तीपटू जिल्हास्तरीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी करून तालुक्याचे व शाळेचे नाव उज्ज्वल करतील, असा दृढ विश्वास शाळा व्यवस्थापनाने व्यक्त करत खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers