पाचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : सध्याच्या डिजिटल आणि धावपळीच्या युगात युवा पिढी भरकटण्यापासून वाचवणे आणि त्यांना व्यसनाधीनतेच्या महाजालातून बाहेर काढणे ही काळाची गरज बनली आहे. याच सामाजिक जाणिवेLineतून ‘जीवनाची निवड करा, ड्रग्जला नाही म्हणा, आणि एक चांगला उद्या घडवा’ असा परखड संदेश देत पाचगणी येथील श्रीमती मीनलबेन मेहता महाविद्यालयात अंमली पदार्थ व व्यसनमुक्ती जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. ‘इनर व्हील क्लब ऑफ पाचगणी’ आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक सातारा पोलीस दलातील श्री. भरत जाधव यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पातळीवर होणारे घातक परिणाम सविस्तर पटवून दिले. आजकाल चोरट्या मार्गाने पसरणारे ड्रग्जचे नेटवर्क, त्याची तस्करी आणि नकळत या चक्रात अडकणाऱ्या तरुणाईची होणारी दैना यावर त्यांनी प्रकाश टाकला. व्यसनामुळे केवळ एका व्यक्तीचे आरोग्य बिघडत नाही, तर संपूर्ण कुटुंब आणि त्याचे भवितव्य उद्ध्वस्त होते. त्यामुळे कायद्याची कडक कारवाई आणि आरोग्याची होणारी हानी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता अभ्यासावर व निरोगी जीवनशैलीवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच परिसरात कुठेही अंमली पदार्थांची विक्री किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देऊन जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य बजावण्याचे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सहायक पोलीस निरीक्षक (ए.पी.आय.) श्री. दिलीप पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत इनर व्हील क्लबच्या या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. आजच्या तरुणाईला योग्य दिशा दाखवण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. महाविद्यालयाचे प्राचार्य मिर्झापुरे सर यांच्यासह सर्व शिक्षकवृंदाने या सत्रासाठी विशेष सहकार्य केले.
या जनजागृती सत्राला इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा श्वेता बोधे, उपाध्यक्षा शितल पवार, सचिव स्नेहा सिंह होळकर, संपादिका जयश्री बोधे, माजी अध्यक्षा संगीता पाटील, खजिनदार गौरी भिलारे, गांधाली थोपटे, आरती शिंदे आणि वर्षा कासुर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच रोटरी परिवारातील रोटे. अमित बोधे, रोटे. अशोक पाटील, रोटे. किरण पवार, रोटे. नितीन भिलारे व रोटे. जयवंत भिलारे यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी या सत्राचा लाभ घेत व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प केला.



