Home » पांचगणी » तापोळा केबल स्टे ब्रिजचे शिल्पकार अजय देशपांडे यांना राज्य सरकारचा ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ घोषित :१५ सप्टेंबरला ‘अभियंता दिनी’ होणार गौरव

तापोळा केबल स्टे ब्रिजचे शिल्पकार अजय देशपांडे यांना राज्य सरकारचा ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ घोषित :१५ सप्टेंबरला ‘अभियंता दिनी’ होणार गौरव

पांचगणी न्यूज नेटवर्क

पांचगणी, दि. ११ :सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ते, पूल आणि प्रशासकीय इमारतींसारखे महत्त्वपूर्ण विकास प्रकल्प उभारताना गुणवत्तेचा उच्च दर्जा आणि सुरक्षितता राखण्यात तांत्रिक कौशल्य सिद्ध करणारे उपअभियंता अजय देशपांडे यांना राज्य शासनाचा मानाचा ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ घोषित झाला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा येथील शिवसागर जलाशयावर उभारण्यात आलेल्या आणि सातारा जिल्ह्याची नवी ओळख बनलेल्या पहिल्या भव्य ‘केबल स्टे ब्रिज’च्या बांधकामात बजावलेल्या अतुलनीय कामगिरीची विशेष दखल घेत राज्य सरकारने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असताना आपल्या तांत्रिक कौशल्याचा, प्रशासकीय अनुभवाचा आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाचा उपयोग करून लोकोपयोगी प्रकल्प वेळेत व दर्जेदारपणे पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा राज्य सरकारतर्फे दरवर्षी सन्मान केला जातो. अजय देशपांडे यांनी महाबळेश्वर येथे उपअभियंता म्हणून कार्यरत असताना तापोळा येथील अत्यंत आव्हानात्मक आणि निसर्गरम्य शिवसागर जलाशयावरील केबल स्टे पुलाच्या निर्मितीची धुरा अत्यंत सक्षमपणे सांभाळली. अभियांत्रिकीच्या दृष्टीने अत्यंत जटील मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पात तांत्रिक अचूकता, बांधकामाची गुणवत्ता आणि सुरक्षिततेचे निकष पाळण्यावर त्यांनी विशेष भर दिला होता. या पुलामुळे दुर्गम आणि कांदाटी खोऱ्यातील गावांमधील दळणवळणाचा प्रश्न कायमचा सुटून पर्यटनालाही मोठी चालना मिळाली आहे.

​भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस राज्यभरात ‘अभियंता दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या अभियंता दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष राज्यस्तरीय सोहळ्यात अजय देशपांडे यांना प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवरांच्या हस्ते या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

​सध्या फलटण येथे उपअभियंता म्हणून सेवा बजावत असलेल्या अजय देशपांडे यांच्या या गौरवामुळे सातारा जिल्ह्याच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच बांधकाम क्षेत्रातील अभियंत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers