पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी, ता. 15 : क्रीडा आणि बौद्धिक गुणांचा सुंदर संगम साधत येथील नामांकित विद्या निकेतन हायस्कूलची विद्यार्थिनी श्रावणी सपकाळ हिने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. १४ वर्षांखालील मुलींच्या अत्यंत चुरशीच्या गटात श्रावणीने द्वितीय क्रमांक पटकावत यश संपादन केले असून, तिच्या या यशामुळे पाचगणीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील कॉनव्हेंट हायस्कूल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत महाबळेश्वर तालुक्यातील अनेक शाळांमधील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात श्रावणीने सुरुवातीच्या डावापासूनच उत्कृष्ट बुद्धीचातुर्य, अचूक चाली आणि संयमी खेळाचे दर्शन घडवले. प्रत्येक डावात अत्यंत आत्मविश्वासाने खेळत तिने प्रतिस्पर्धी खेळाडूंना कडवी झुंज दिली आणि उपविजेतेपदावर आपले नाव कोरले.
शालेय जीवनात केवळ अभ्यासालाच महत्त्व न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी विद्या निकेतन हायस्कूलकडून सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात. क्रीडा क्षेत्रातील या यशाने शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
श्रावणीच्या या विशेष यशाबद्दल विद्या निकेतन हायस्कूलचे प्राचार्य अथर्व बिरामणे सर, ॲडमिनिस्ट्रेटर स्वाती बिरामणे मॅडम तसेच तिला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक नितीन सपकाळ यांनी तिचे विशेष कौतुक केले. श्रावणीने केवळ तालुक्यातच नव्हे, तर आगामी जिल्हा व राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतही अशीच दैदिप्यमान कामगिरी करून शाळा आणि परिसराचे नाव उज्ज्वल करावे, अशा शब्दांत तिचे अभिनंदन करत पुढील क्रीडा प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. श्रावणीच्या या यशाबद्दल पाचगणी शहर व परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



