Home » जावळी » दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालय दापवडीचे उपशिक्षक नितीन घाडगे यांना ‘जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर; २७ वर्षांच्या शैक्षणिक व सामाजिक सेवेची पावती

दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालय दापवडीचे उपशिक्षक नितीन घाडगे यांना ‘जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर; २७ वर्षांच्या शैक्षणिक व सामाजिक सेवेची पावती

पांचगणी न्यूज नेटवर्क

​दापवडी : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवणारे, इंग्रजी विषयावर प्रभुत्व मिळवून दरवर्षी १०० टक्के निकालाची परंपरा जपणारे दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालय दापवडी (ता. जावळी) येथील उपशिक्षक नितीन विनायक घाडगे (मूळ रा. ता. कोरेगाव, जि. सातारा) यांची सन २०२६ च्या मानाच्या ‘जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारा’साठी निवड झाली आहे. सातारा जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, जिल्हा टी.डी.एफ., उच्च माध्यमिक टी.डी.एफ. आणि जिल्हा महिला टी.डी.एफ. यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 

​गेल्या २७ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या नितीन घाडगे यांनी केवळ वर्गातील अध्यापनापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल साधनांचा शैक्षणिक प्रक्रियेत प्रभावी वापर केला आहे. शिष्यवृत्ती परीक्षा असो वा NMMS आणि दहावीची बोर्ड परीक्षा; त्यांच्या अभ्यासू व तंत्रस्नेही मार्गदर्शनामुळे अनेक गुणवंत विद्यार्थी घडले आहेत. विद्यालयाच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला असून, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्तरावरून शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत पुरवून त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली आहे.

​शैक्षणिक कार्यासोबतच संघटन व सामाजिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. सन २०१९ ते २०२३ या कालावधीत त्यांनी टीडीएफ संघटनेचे जावळी तालुका सचिव म्हणून जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. विविध शैक्षणिक, सामाजिक व राजकीय मान्यवरांशी समन्वय साधून त्यांनी विद्यालयात अनेक उपक्रम राबवले, ज्यामुळे संस्थेच्या नावलौकिकात मोठी भर पडली आहे. त्यांच्या या चौफेर योगदानाची दखल घेऊनच या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

​नितीन घाडगे यांच्या या यशाबद्दल कोयना एज्युकेशन सोसायटी तळदेवचे अध्यक्ष किसनराव जाधव, उपाध्यक्ष धोंडीबा जंगम, सचिव डी. के. जाधव, संचालक मंडळ, दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि जावळी-कोरेगाव तालुक्यातील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers