Home » पांचगणी » दत्तात्रय महाराज कळंबे जावली बँकेचा मुंबईत डंका; ‘बृहन्मुंबई असोसिएशन’चा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार जाहीर : आज मुंबईत वितरण

दत्तात्रय महाराज कळंबे जावली बँकेचा मुंबईत डंका; ‘बृहन्मुंबई असोसिएशन’चा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार जाहीर : आज मुंबईत वितरण

पांचगणी न्यूज नेटवर्क

पाचगणी : सहकार क्षेत्रातील अग्रगण्य आणि विश्वासू संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि., मुंबई’ने आपल्या दैदिप्यमान वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. ‘दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., वडाळा’ यांच्या वतीने आयोजित “उत्कृष्ट बँक पुरस्कार” स्पर्धेत १,००१ कोटी ते ५,००० कोटी रुपयांपर्यंत एकूण व्यवसाय असलेल्या बँकांच्या गटातून कळंबे जावली बँकेने संपूर्ण मुंबई आणि राज्यभरातून प्रथम क्रमांक पटकावून “सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार” आपल्या नावे केला आहे.

 

​बँकेने आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि अत्याधुनिक ग्राहकसेवेच्या जोरावर ही अद्वितीय किमया साधली आहे. या पुरस्काराचा पारितोषिक वितरण समारंभ आज, बुधवार दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता कुर्ला (पूर्व) येथील बंटारा भवन येथे असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान पार पडत आहे.

​

बँकेच्या या उत्तुंग यशाबद्दल आनंद व्यक्त करताना बँकेचे अध्यक्ष विक्रम भिलारे यांनी सांगितले की, “बँकेने नुकताच २ हजार कोटींच्या ठेवींचा ऐतिहासिक टप्पा यशस्वीरीत्या पार केला आहे. सध्या बँकेशी ५२ हजारांहून अधिक सभासद जोडलेले असून, चालू आर्थिक वर्षात बँकेने १० कोटी ३९ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. संचालक मंडळाचे दूरदृष्टीचे नियोजन, कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम आणि लाखो ग्राहकांचा बँकेवर असलेला अढळ विश्वास या तीन स्तंभांवरच बँकेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. ग्राहकांचे हित सदैव केंद्रस्थानी ठेवून काम केल्याचेच हे फळ असून, या पुरस्कारामुळे भविष्यात आणखी जोमाने काम करण्याची उर्मी आम्हाला मिळाली आहे.”

 

​बँकेच्या या अभूतपूर्व यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी, सरव्यवस्थापक, उपसरव्यवस्थापक, सहाय्यक सरव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, सर्व शाखा व्यवस्थापक, को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉइज युनियनचे प्रतिनिधी आणि संपूर्ण अधिकारी व कर्मचारी वर्गाचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. सहकार क्षेत्रातील या यशाबद्दल जावली, महाबळेश्वर, पाचगणी आणि मुंबईतील ग्राहकांनी बँकेवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers