Home » भिलार » दारातच आला ‘वनराज’! पुस्तकांच्या भिलारमध्ये बिबट्याची डरकाळी; जननीमाता परिसरात उडाली प्रचंड खळबळ

दारातच आला ‘वनराज’! पुस्तकांच्या भिलारमध्ये बिबट्याची डरकाळी; जननीमाता परिसरात उडाली प्रचंड खळबळ

पांचगणी न्यूज नेटवर्क /प्रमोद रांजणे

भिलार : स्टॉल्सवर सजलेली रंगीबेरंगी पुस्तके, पर्यटकांची सलग ये-जा आणि गुलाबी थंडीने नटलेले ‘पुस्तकांचे गाव’ भिलार… पण याच भिलारच्या जननीमाता परिसरात मंगळवारी रात्रीच्या शांततेचा भंग करत थेट बिबट्यानेच ‘हजेरी’ लावली! जंगलाची सीमा ओलांडून हा वनराज थेट एका बंगल्याच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्याने भिलारसह संपूर्ण महाबळेश्वर-पाचगणी पट्ट्यात एकच खळबळ उडाली आहे.

​घडले असे की, जननीमाता परिसरातील एका बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अंधाराचा फायदा घेत बिबट्याने दबा धरला होता. सावज टप्प्यात येताच बंगल्यातील पाळीव कुत्र्यावर त्याने वीजेच्या वेगाने झेप घेतली. अचानक झालेल्या या हल्ल्याने कुत्रा आणि बिबट्या यांच्यात तुंबळ झटापट सुरू झाली. सुदैवाने, कुत्र्याची चपळाई आणि त्याच वेळी बंगल्यातील माळ्याच्या ही थरारक घटना निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला. माळ्याने प्रसंगावधान राखून जीवाची पर्वा न करता मारलेला आकांतातला हंबरडा आणि गलका ऐकून बिबट्याने तिथून लगतच्या घनदाट झाडीत धूम ठोकली.

https://www.facebook.com/share/v/19GGknfZw2/

माळ्याच्या त्या एका आरोळीमुळे एका जिवाचा प्राण वाचला खरा, पण या घटनेने ग्रामस्थांच्या आणि पर्यटकांच्या काळजाचा ठोका मात्र चुकवला आहे. भिलार परिसर हा निसर्गरम्य आणि घनदाट वनराईने वेढलेला असल्याने वन्यजीवांची हजेरी नवीन नाही, परंतु आता हा शिकारी थेट माणसाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपल्याने सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.​पर्यटनाचा गजबजलेला मोसम आणि संध्याकाळच्या वेळी रस्त्यांवर असणारी स्थानिक अन् पर्यटकांची वर्दळ पाहता, वनविभागाने आता केवळ कागदी घोडे न नाचवता मैदानात उतरावे, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या परिसरात तातडीने ट्रॅप कॅमेरे लावावेत, रात्रीच्या वेळी वन कर्मचाऱ्यांची धडक गस्त सुरू करावी आणि गरज पडल्यास पिंजरा लावून या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे. आता वनविभाग यावर काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers