पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : आगोदरच पावसाने ताण दिल्याने माना टाकणाऱ्या पिकांना वाचवण्यासाठी रांजणी (ता. जावली) येथील शेतकरी धडपडत असतानाच, आता वन्यप्राण्यांच्या त्रासाने शेतकऱ्यांचे उरलेसुरले जगणेही मुश्कील केले आहे. रांजणी शिवारात गेल्या काही दिवसांपासून रानगव्यांनी धुमाकूळ घातला असून, काल रात्री जननी शिवारात गव्यांच्या कळपाने थेट भातशेतीत शिरून धुडगूस घातला. यामुळे हाताशी आलेले पीक पुरते उद्ध्वस्त झाले असून, दुष्काळात तेरावा महिना ठरलेल्या या संकटामुळे स्थानिक बळीराजा पूर्णपणे हतबल आणि चिंताग्रस्त झाला आहे.
रांजणी हे गाव मूळचे धरणग्रस्त गाव म्हणून ओळखले जाते. धरणात जमिनी गेल्यामुळे येथील बहुतांश शेतकऱ्यांकडे अतिशय तुटपुंजी शेती उरली आहे. याच उपलब्ध जमिनीत रात्रंदिवस घाम गाळून शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. मात्र, चालू हंगामात पावसाने ओढ दिल्याने पिके सुकू लागली आहेत. त्यातच आता रानगव्यांचा त्रास वाढल्याने ‘आभाळच फाटले तिथे ठिगळ कुठे लावायचे?’ अशी बिकट अवस्था रांजणीतील शेतकऱ्यांची झाली आहे.
भाताची रोपे तुडवून खाल्ली; शेतकरी सतीश रांजणे यांचे मोठे नुकसान
जननी शिवारात असलेल्या गट क्रमांक ६६७ आणि खाते क्रमांक ८५ मधील १८ गुंठे भातशेतीत काल रात्री रानगव्यांच्या टोळक्याने प्रवेश केला. येथील शेतकरी सतीश रामचंद्र रांजणे यांच्या मालकीच्या या शेतात गव्यांनी रात्रभर हैदोस घालत भाताची उभी रोपे पायाखाली तुडवून फत्ते केली, तर काही रोपे खाऊन फस्त केली. सकाळी शेतात गेल्यावर सतीश रांजणे यांना आपल्या डोळ्यांदेखत श्रमाचे पार मातीमोल झालेले चित्र पाहायला मिळाले. पाऊस नसल्याने आधीच भात पीक सुकण्याच्या मार्गावर होते, त्यात गव्यांच्या या हल्ल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
पश्चिम महाराष्ट्राच्या दुर्गम आणि डोंगराळ भागात रानगवे अन् वन्यप्राण्यांचा मानवी वस्ती व शेतांकडे असणारा वावर दिवसेंदिवस धोक्याची घंटा ठरत आहे. रांजणी आणि परिसरातील शेतकरी आधीच निसर्गाच्या अवकृपेने पिचले गेले आहेत, त्यात वनजिवांच्या या उपद्रवामुळे शेती करावी की नाही, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
वन विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन सतीश रांजणे यांच्यासह नुकसानग्रस्त भागाचा तत्काळ प्रत्यक्ष पंचनामा करावा आणि त्यांना तात्काळ योग्य ती भरपाई मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी रांजणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच या भागात रानगव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने गस्त वाढवून ठोस उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.



