पांचगणी न्यूज नेटवर्क
वाई : तालुक्यातील वाई एमआयडीसी परिसरातील एका नामांकित फाउंड्री कंपनीत शनिवारी (दि. १८) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत थरारक आणि मन सुन्न करणारी घटना घडली. कंपनीत कार्यरत असलेल्या एका ४२ वर्षीय कामगाराने चालू असलेल्या धगधगत्या मेटल भट्टीत अचानक उडी घेऊन आत्महत्या केली. या दुर्देवी घटनेत कामगाराचा जागीच होरपळून मृत्यू झाला असून, संपूर्ण एमआयडीसी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दुर्गा रोहिता प्रधान (वय ४२, मूळ रा. राजाबासा, ता. टेटटांगर, जि. सिंहभूम, झारखंड; सध्या रा. वाई एमआयडीसी) असे मृत कामगाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास फाउंड्रीमध्ये नियमित काम सुरू होते. भट्टी प्रचंड उष्णतेने धगधगत होती. काम चालू असतानाच दुर्गा प्रधान यांनी अचानक कोणतीही कल्पना न देता थेट मेटल भट्टीत उडी घेतली. हा प्रकार तेथे उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, भट्टीतील तापमान आणि प्रचंड उष्णतेमुळे काही क्षणातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
दुर्गा प्रधान हे गेल्या काही दिवसांपासून तीव्र मानसिक नैराश्यात (डिप्रेशन) असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. याच मानसिक तणावातून त्यांनी हे अत्यंत टोकाचे आणि भयानक पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वाई येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. या घटनेची माहिती झारखंड येथील त्यांच्या मूळ गावी असलेल्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. दरम्यान, फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाला भेट देऊन वैज्ञानिक तपासाच्या दृष्टीने आवश्यक पुरावे आणि नमुने संकलित केले आहेत.
वाई पोलिसांकडून या घटनेची नोंद घेण्यात आली असून, प्रधान यांनी नेमक्या कोणत्या कारणांमुळे मानसिक नैराश्यात येऊन ही आत्महत्या केली, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



