पांचगणी न्यूज नेटवर्क
करहर : उशाला हातगेघर धरणाचा विस्तीर्ण जलाशय आणि सभोवताली हिरव्यागार डोंगररांगांची सुंदर निसर्गचौकट लाभलेल्या जावळी तालुक्यातील कावडी गावाने धरणग्रस्तांच्या वेदनांवर मात करत समृद्धीचा एक नवा आदर्श उभा केला आहे. ‘मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज अभियाना’त सातारा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावल्यानंतर, विभागीय मूल्यमापन समितीच्या पाहणीदरम्यान या गावाने आपल्या लोकाभिमुख आणि पर्यावरणपूरक विकासाचा दणदणीत ठसा उमटवला. दुर्गमतेची सीमा ओलांडून आत्मनिर्भरतेकडे पाऊल टाकणाऱ्या कावडी ग्रामपंचायतीची ही कामगिरी केवळ कौतुकास्पद नसून, राज्यस्तरावरही हे गाव नक्कीच बाजी मारेल, असा ठाम विश्वास अहिल्यानगरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मूल्यमापन समितीचे अध्यक्ष विजय मुळीक यांनी व्यक्त केला.
बुधवारी विभागीय समिती कावडी गावात दाखल होताच ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक पोशाख आणि महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने अवघे गाव उत्सवाच्या उत्साहात न्हाऊन निघाले होते. या पाहणी दौऱ्यात समितीने केवळ कागदोपत्री कारभारावर समाधान न मानता प्रत्यक्ष मैदानात उतरून ग्रामपंचायत कामकाज, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आणि जलसंवर्धनाच्या कामांची सखोल तपासणी केली. स्थानिक रोजगार आणि गावाच्या उत्पन्नाला हातभार लावण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वतःच्या पुढाकारातून सुरू केलेल्या विशेष उपहारगृहाच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेने समिती सदस्यांना भुरळ घातली. हा उपक्रम राज्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी दीपस्तंभ ठरेल, असा विशेष गौरवही यावेळी करण्यात आला.
गावातील या अभूतपूर्व बदलामागे महिलांचा सक्रिय सहभाग आणि सर्वपक्षीय ग्रामस्थांची वज्रमूठ हीच खरी ताकद असल्याचे सांगताना जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी, सर्वांच्या एकजुटीमुळेच कावडी आज राज्यस्तरीय स्पर्धेच्या उंबरठ्यावर उभी असल्याचे अभिमानाने नमूद केले. निसर्गाचे वरदान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख संगम साधत कावडीने दाखवून दिलेली ही विकासदिशा आज संपूर्ण विभागासाठी प्रेरणादायी ठरत आहे.याप्रसंगी समिती सदस्य रामप्रसाद लाहोटी, राजन पाटील, दादासाहेब गुंजाळ, पी. एस. म्हस्के, रवींद्र महाजन, राहुल देसाई यांच्यासह माजी आमदार सदाशिव सपकाळ, वसंतराव मानकुमरे, गोरख महाडिक, गटविकास अधिकारी निलेश पाटील, संदीप परामणे, सरपंच यशवंत मानकुमरे, ग्रामविकास अधिकारी मंगेश शिंदे व विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



