पांचगणी न्यूज नेटवर्क
करहर : सार्वजनिक प्रशासन क्षेत्रात आपल्या गतिमान कारभाराने आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांनी प्रशासनाचा वेगळा ठसा उमटवणारे जावळी तालुक्यातील सनपाने गावाचे सुपुत्र आणि नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना राज्यस्तरीय मानाचा ‘एस. एस. गडकरी पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनच्या (IIPA) महाराष्ट्र प्रादेशिक शाखेकडून हा पुरस्कार दिला जातो. मुंबईतील मंत्रालयात येत्या २१ सप्टेंबर रोजी राज्याचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते पवार यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
ओमकार पवार यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी अनेक प्रभावी योजना राबविल्या आहेत. विशेषतः त्यांनी आपल्या कल्पकतेतून सुरू केलेले ‘नवचेतना अभियान’ आणि कुपोषणमुक्तीसाठी मैलाचा दगड ठरलेला ‘पोषण दूत’ हा उपक्रम संपूर्ण राज्यात कौतुकास्पद ठरला आहे. ग्रामीण भागातील तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रशासकीय सेवा पारदर्शकपणे पोहोचवणे, कुपोषण निर्मूलनासाठी लोकचळवळ उभारणे आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, या त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण कामगिरीची दखल घेऊनच या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
जावळीच्या दुर्गम भागातील सनपानेसारख्या छोट्याशा गावातून सनदी सेवेपर्यंत मारलेली धडक आणि त्यानंतर प्रशासनात मिळवलेले हे उत्तुंग यश संपूर्ण जावळी तालुक्यासह सातारा जिल्ह्यासाठी भूषणावह ठरले आहे. या यशाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री मकरंद पाटील यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी ओमकार पवार यांचे विशेष अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशामुळे जावळीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



