Home » पांचगणी » नितीनभाई भिलारे यांच्या ‘महाबळेश्वर फॉरेस्ट’ लघुपटाचा ५व्या ‘इंटरनॅशनल टुरिझम शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’मध्ये गौरव :आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नितीनभाई भिलारे यांच्या ‘महाबळेश्वर फॉरेस्ट’ लघुपटाचा ५व्या ‘इंटरनॅशनल टुरिझम शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’मध्ये गौरव :आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान

पांचगणी न्यूज नेटवर्क

पांचगणी : पर्यटनाची राजधानी आणि निसर्गाचे वरदान लाभलेल्या महाबळेश्वरच्या नावात जागतिक पर्यटन दिनी आणखी एक सुवर्णपान जोडले गेले आहे. ५व्या ‘इंटरनॅशनल टुरिझम SHORT FILM FESTIVAL २०२६’ मध्ये ‘महाबळेश्वर फॉरेस्ट’ या लघुपटाने प्रतिष्ठित ‘आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट पुरस्कार’ (International Tourism Short Film Award) पटकावून जागतिक पटलावर महाराष्ट्राची मान उंचावली आहे. २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून या पुरस्काराची घोषणा झाल्याने संपूर्ण पर्यटन क्षेत्रात आणि स्थानिक कला जगतात उत्साहाचे वातावरण आहे.

​परबन्ना फाउंडेशन, महाराष्ट्र पर्यटन विभाग (MTDC), महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ (MSFDC) आणि ए अँड टी इंडस्ट्रीज प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. जगभरातील विविध पर्यटनविषयक लघुपटांमधून महाबळेश्वरच्या समृद्ध आणि गूढ निसर्गसौंदर्यावर आधारित ‘महाबळेश्वर फॉरेस्ट’ या लघुपटाची विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

​या लघुपटाची निर्मिती आणि प्रभावी दिग्दर्शन प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते नितीनभाई भिलारे यांनी केले आहे. महाबळेश्वरच्या निसर्गसंपन्न जंगलाचे सौंदर्य, तेथील जैवविविधता आणि पर्यावरणपूरक पर्यटनाचा संदेश अत्यंत कलात्मकरीत्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. लघुपटाला लाभलेले दर्जेदार छायांकन गणेश आंब्राळे यांचे असून, महेश शेलार यांच्या आखीव-रेखीव संकलनाने आणि विशाल डांगिस्ते यांच्या प्रभावी संवाद लेखनाने या लघुपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.

​स्थानिक पर्यटनाला जागतिक ओळख:

हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आनंद व्यक्त करताना निर्माता-दिग्दर्शक नितीनभाई भिलारे म्हणाले, “जागतिक पर्यटन दिनाच्या दिवशीच हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळणे हा संपूर्ण महाबळेश्वरकरांसाठी आणि आमच्या टीमसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. महाबळेश्वरचा निसर्ग आणि येथील पर्यटन हे फक्त फिरण्याचे ठिकाण नसून ती एक समृद्ध जीवनशैली आहे, हेच या लघुपटाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न होता. या पुरस्कारामुळे भविष्यात अशाच कलात्मक आणि पर्यटनपूरक प्रकल्पांसाठी नवीन ऊर्जा मिळाली आहे.”

​महाबळेश्वरच्या निसर्गवैभवाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या ‘महाबळेश्वर फॉरेस्ट’ लघुपटाच्या संपूर्ण टीमवर आणि नितीनभाई भिलारे यांच्यावर सध्या राजकीय, सामाजिक, व्यावसायिक आणि पत्रकारिता क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers