पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : हवेचे ठिकाण आणि पर्यटकांचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांचगणी आणि टेबल लँड परिसरात मोकळे फिरणारे घोडे आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. सार्वजनिक रस्ते, मोकळी मैदाने आणि पर्यटनस्थळांवर घोड्यांना चरण्यासाठी अथवा मुक्तपणे सोडणाऱ्या घोडे व्यावसायिकांना पांचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. यासंदर्भात पोलिसांनी एक अधिकृत सूचना जारी करत घोडे व्यावसायिकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
पांचगणी आणि प्रेक्षणीय टेबल लँड परिसराला भेट देण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही घोडे व्यावसायिकांकडून आपले घोडे सार्वजनिक ठिकाणी मोकळे सोडले जात असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. हे मोकळे घोडे अचानक रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून, गंभीर अपघातांचा धोकाही प्रचंड वाढला आहे. अनेकदा हे घोडे पर्यटकांच्या अंगावर धावून गेल्याने भीतीचे वातावरण निर्माण होते. याशिवाय, सार्वजनिक ठिकाणी घोड्यांच्या वावरामुळे अस्वच्छता पसरत असून शहराच्या सौंदर्यालाही बाधा पोहोचत आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत पांचगणी पोलिसांनी घोडे व्यावसायिकांना ताकीद दिली आहे की, त्यांनी आपल्या मालकीचे घोडे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मुक्तपणे सोडू नयेत. घोड्यांच्या देखरेखीसाठी योग्य आणि सुरक्षित व्यवस्था करून त्यांना केवळ निर्धारित ठिकाणीच ठेवण्यात यावे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचा इशारा
“सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नाही. या सूचनेचे उल्लंघन करून जे व्यावसायिक आपले घोडे रस्त्यावर मोकळे सोडतील, त्यांच्याविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”
पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मोकळ्या घोड्यांच्या उपद्रवापासून पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सर्व संबंधित घोडे व्यावसायिकांनी या सूचनेची गांभीर्याने नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



