पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या पाचगणी येथील नामांकित विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या क्रीडा मुकुटात आणखी एक सुवर्णमय तुरा रोवला गेला आहे. फलटण येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘७-अ-साईड इंटर डिस्ट्रिक्ट फुटबॉल टूर्नामेंट २०२६’ या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत विद्या निकेतनच्या फुटबॉल संघाने आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या आणि सांघिक खेळाच्या जोरावर दिमाखदार कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत विविध भागांतून आलेले अनेक नामांकित संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. या तीव्र स्पर्धेच्या वातावरणात विद्या निकेतनच्या खेळाडूंनी कमालीचा आत्मविश्वास, शिस्त आणि मैदानावरील उत्कृष्ट समन्वयाचे दर्शन घडवले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही माघार न घेता खेळाडूंनी जिद्दीच्या जोरावर फलटण जिमखाना संघाला नमवत उपउपांत्य व उपांत्य फेरीत धडक मारली आणि अंतिम टप्प्यात चमकदार कामगिरी करत तृतीय क्रमांकावर आपले नाव कोरले.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रसिद्ध फुटबॉल कोच अमित काळे यांच्या हस्ते विजयी संघातील खेळाडूंना चषक व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. खेळाडूंच्या या यशाने पाचगणी शहरासह संपूर्ण क्रीडा क्षेत्रात कौतुकाचा वर्षाव होत आहे. याप्रसंगी संघाला अचूक मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक मोनील शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते.
विद्या निकेतन स्कूलने अभ्यासासोबतच खेळ आणि क्रीडा संस्कृती जपण्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. खेळाडूंच्या या दणदणीत यशाबद्दल संस्थेच्या संचालिका भारती बिरामणे, विराज बिरामणे, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमींनी विजेत्या खेळाडूंचे आणि कोच मोनील शिंदे यांचे मनापासून अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांची ही मेहनत व खेळाडूवृत्ती आगामी काळातील राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करत खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. तर विजयी संघाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



