Home » पांचगणी » पांचगणी पोलीस ठाण्यात विविध विभागांची संयुक्त बैठक: बेवारस वाहने, कर संकलन आणि वाहतूक नियोजनावर महत्त्वपूर्ण निर्णय

पांचगणी पोलीस ठाण्यात विविध विभागांची संयुक्त बैठक: बेवारस वाहने, कर संकलन आणि वाहतूक नियोजनावर महत्त्वपूर्ण निर्णय

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पांचगणी : पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पाचगणी-महाबळेश्वर परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी, पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. आज सकाळी पांचगणी पोलीस ठाणेच्या सभागृहात ‘विशेष प्रकल्प अंतर्गत पर्यटन स्थळ विकास व पर्यटक सुरक्षितता’ या विषयावर एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली.

वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली यावेळी पांचगणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे, मुख्याधिकारी पंडित पाटील, महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे, पांचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत रस्ते दुरुस्तीपासून ते थेट पार्किंग व्यवस्थापनापर्यंत अनेक धाडसी व प्रभावी सूचना देण्यात आल्या.

​बैठकीत सुरूर ते पोलादपूर या मुख्य महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे तातडीने भरून घेण्याचे निर्देश संबंधित ठेकेदारांना देण्यात आले. तसेच, रस्त्याचे रुंदीकरणाचे काम गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. पावसाळ्यात पसरणी घाटातील दत्त मंदिर परिसर आणि अवकाळी भागात खचलेल्या रस्त्यामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे; तेथे तातडीने मजबूत ‘रिटर्निंग वॉल’ (संरक्षक भिंत) बांधण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय धुक्यात आणि मुसळधार पावसात वाहनधारकांना रस्ता स्पष्ट दिसावा यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पांढरे पट्टे मारण्याच्या स्पष्ट सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या.

​शनिवार आणि रविवारी होणारी पर्यटकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, या वीकेंडला अवजड वाहतूक कुडाळ मार्गे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बेदरकारपणे धावणारे आणि ओव्हरलोड डंपर चालकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आरटीओ विभागाला देण्यात आले आहेत. शहरात येणाऱ्या पर्यटकांची वाहने व्यवस्थित पार्क व्हावीत यासाठी मॅप्रो कंपनीने स्वतःचे स्वयंसेवक नेमावेत, वॅक्स म्युझियम आणि प्युअर बेरीज प्रशासनाने पर्यटकांची वाहने रस्त्यावर येणार नाहीत याची दक्षता घेऊन स्वतःच्या पार्किंग परिसरातच ती लावण्याची व्यवस्था करावी, असे ठणकावून सांगण्यात आले.

​पांचगणी शहरातील रस्त्यांच्या कडेला अनेक दिवसांपासून धूळ खात पडलेल्या बेवारस वाहनांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. या वाहनांवर नगरपालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी लावून धरली. याशिवाय, संजीवन नाका येथील एमएसईबीची डीपी रस्त्याच्या मधोमध अडथळा ठरत असल्याने ती मागील बाजूस शिफ्ट करण्याचे आदेश वीज वितरण अधिकाऱ्यांना देण्यात आले. पर्यटकांचा वेळ वाचवण्यासाठी आणि कर संकलनात पारदर्शकता आणण्यासाठी पाचगणी व महाबळेश्वर नगरपालिकेने ‘क्यूआर कोड प्रणाली’चा वापर करावा, असा महत्त्वपूर्ण सल्लाही या बैठकीत देण्यात आला.

​या बैठकीस , सातारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पांचगणी व महाबळेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नगरसेवक नारायण बिरामणे, राजेंद्र पारठे,महामार्गाचे कंत्राटदार, एमएसईबी अधिकारी, स्थानिक व्यावसायिक प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते. परिसरातील पर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करावे, असा स्पष्ट इशारा बैठकीदरम्यान देण्यात आला.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers