पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : “आपण ज्या समाजात राहतो, वाढतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या निस्पृह आणि पवित्र भावनेतून सामाजिक कार्यकर्ते दीपक कांबळे हे दरवर्षी नगरपालिका शाळेतील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करतात. त्यांचे हे निरंतर सुरू असलेले कार्य केवळ कौतुकास्पद नसून, समाजातील इतर घटकांसाठीही अत्यंत प्रेरणादायी आणि दिशादर्शक आहे,” असे गौरवद्गार पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे यांनी काढले.
बौद्ध पौर्णिमा आणि महामानवांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून पँथर सेनेच्या वतीने पाचगणी येथील नगरपालिका शाळा क्रमांक १ व २ मधील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पाचगणीतील भिमनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यात नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. याप्रसंगी दोन्ही शाळांमधील ३५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
पुढे बोलताना नगराध्यक्ष बगाडे म्हणाले की, “शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे मुख्य माध्यम आहे. आजच्या काळात महामानवांचे विचार खऱ्या अर्थाने रुजवायचे असतील तर गोरगरीब मुलांच्या हाताला पुस्तके मिळाली पाहिजेत. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आणि सामाजिक बांधिलकी जपत नगरपरिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही हे मोलाचे साहित्य देण्यात आले आहे. या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत एक नवा उत्साह आणि गोडी निर्माण झाली आहे. आजच्या पिढीला घडवण्यासाठी असे उपक्रम काळाची गरज आहेत.”
याप्रसंगी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे, मुख्याधिकारी पंडित पाटील, नगरसेविका विमल भिलारे, नगरसेवक अमित कांबळे, महेश खांडके, नारायण बिरामणे, आकाश बगाडे, सौ. सुप्रिया माने, माधुरी कासुर्डे, परवीन मेमन यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पँथर सेनेचे राज्य अध्यक्ष दीपक कांबळे, बांधकाम व्यावसायिक प्रशांत मोरे, महेश माने, अजिज भाई मर्चंट, वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्षा सौ. सुनंदा मोरे, राजू काकडे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष जॉन जोसेफ, कार्याध्यक्ष अतिश भोसले, ॲड. आस्था कांबळे, नगरपालिका शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पँथर सेनेचे राज्य अध्यक्ष दीपक कांबळे यांच्या अखंड सामाजिक कार्याचा सन्मान करत पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश मोरे गुरुजी यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडले. त्यांनी पँथर सेनेच्या सामाजिक कार्याचा आलेख उपस्थितांसमोर ठेवला. श्रीकृष्ण कापसे यांनी सूत्रसंचालन करत कार्यक्रमात रंगत आणली, तर कार्यक्रमाच्या शेवटी लक्ष्मण हिरवे यांनी सर्व उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. हा सोहळा पाचगणी परिसरामध्ये सामाजिक ऐक्य आणि शैक्षणिक क्रांतीचा एक नवा संदेश देऊन गेला.



