Home » पांचगणी » पाचगणीतील विद्यानिकेतन हायस्कूलचा ​’रायझिंग स्टार्स’ फुटबॉल स्पर्धेत उपविजेतेपदासह डबल धमाका

पाचगणीतील विद्यानिकेतन हायस्कूलचा ​’रायझिंग स्टार्स’ फुटबॉल स्पर्धेत उपविजेतेपदासह डबल धमाका

पांचगणी न्यूज नेटवर्क

​ पाचगणी : अंतिम सामन्यात विजयाची ट्रॉफी अगदी थोडक्यात हुकली असली, तरी संपूर्ण स्पर्धेतील सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरीच्या जोरावर विद्यानिकेतन हायस्कूलच्या युवा फुटबॉलपटूंनी ‘ओव्हरऑल चॅम्पियनशिप’वर आपले नाव कोरले. अंजुमन-इन्स्टिट्यूट ऑफ इस्लाम पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजतर्फे आयोजित प्रतिष्ठित ‘पद्मश्री डॉ. झहीर आय. काझी रायझिंग स्टार्स फुटबॉल चॅम्पियन कप २०२६’ स्पर्धेत विद्यानिकेतनच्या अंडर-१७ मुलांच्या संघाने उपविजेतेपदासह क्रीडारसिकांची मने जिंकली.

​स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच वेगवान चाली, अचूक पासिंग, भक्कम बचाव आणि उत्कृष्ट सांघिक समन्वयाच्या जोरावर विद्यानिकेतनच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले. अंतिम सामन्यात जेतेपदासाठी अखेरच्या मिनिटापर्यंत मैदानावर दोन्ही संघांमध्ये तुफान झुंज पाहायला मिळाली. विजयाचा अंतिम चेंडू प्रतिस्पर्ध्याच्या बाजूने झुकला आणि विजेतेपद निसटले; परंतु संपूर्ण स्पर्धेतील चढत्या आलेखाच्या जोरावर गुणतालिकेत आघाडी घेत विद्यानिकेतनने ‘ओव्हरऑल चॅम्पियनशिप’चा मान पटकावून आपल्या कौशल्याची ठसठशीत मोहर उमटवली. ‘फायनल हुकली, पण चॅम्पियनशिप घरात आली’, अशा शब्दांत या संघाचे क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे.

​विद्यानिकेतनचे हे यश विद्यार्थ्यांची मेहनत, शिस्त आणि क्रीडा गुणवत्तेची खरी पावती आहे. क्रीडा विभागाचे योग्य मार्गदर्शन आणि खेळाडूंचा आत्मविश्वास यांमुळेच शाळेच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला, अशा शब्दांत शाळा व्यवस्थापन व क्रीडाप्रेमींनी खेळाडूंचे अभिनंदन केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यानिकेतन हायस्कूलचे प्राचार्य अथर्व बिरामणे, ॲडमिनिस्ट्रेटर सौ. स्वाती बिरामणे आणि क्रीडा शिक्षक  नितीन सपकाळ यांनी सर्व खेळाडू व क्रीडा विभागाचे विशेष कौतुक केले.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers