पांचगणी न्यूज नेटवर्क /प्रमोद रांजणे
पाचगणी : येथील प्रसिद्ध हॅपी अवर्स हायस्कूलमध्ये आज, गुरुवार दि. २० ऑगस्ट रोजी पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय डास दिना’चे औचित्य साधून विशेष जनजागृती कार्यक्रम व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये डासांमुळे होणाऱ्या आजारांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि प्रत्यक्ष आरोग्य सुरक्षा पुरवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या प्रसंगी आरोग्य सहाय्यक संजय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना डासांच्या विविध प्रजाती, त्यांची उत्पत्ती आणि त्यामुळे पसरणाऱ्या गंभीर आजारांविषयी सखोल मार्गदर्शन केले. विविध आकर्षक जाहिरात फलकांचा (पोस्टर) वापर करून डासांची ओळख कशी पटवायची, तसेच मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आणि हत्तीरोग यांसारख्या धोकादायक आजारांचा प्रसार कसा रोखावा, याबाबत प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती त्यांनी दिली. घराच्या आणि शाळेच्या परिसरात पाणी साचू न देणे व स्वच्छता राखणे हेच डासांपासून बचावाचे प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जनजागृती आणि परिसंवादानंतर आरोग्य विभागातर्फे शाळेतील इयत्ता पहिली, चौथी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी धनुर्वाताचे (टी.टी.) लसीकरण करण्यात आले. या लसीकरणाचा लाभ तिन्ही वर्गांतील एकूण ७० विद्यार्थ्यांनी घेतला.
शाळेचे मुख्याध्यापक नितीन प्रभाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सैफ वारणे सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक नितीन प्रभाळे सर यांनी मानले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य सेवक विजय गोंजा रंगारी, आर. व्ही. निकाळजे, नितीन बोराडे, सुवर्णा निकम यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची थेट काळजी घेणारा हा उपक्रम पाचगणी परिसरात कौतुकास्पद ठरला आहे.



