पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणी शहरात मुसळधार पावसाने प्रचंड थैमान घातले असून, शहरात ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडून मोठे नुकसान झाले आहे. यातच आज दुपारी पाचगणी येथील प्रसिद्ध शॉपिंग सेंटरच्या आवारात, ‘हॉटेल फ्रेंड्स ट्रीट’ समोर असलेला एक भलामोठा सिल्व्हर ओकचा वृक्ष मुळासकट उन्मळून पडल्याची खळबळजनक घटना घडली. हा वृक्ष थेट उभ्या असलेल्या वाहनांवर कोसळल्याने एक चारचाकी आणि एक दुचाकी गाडी झाडाखाली सापडून दोन्ही गाड्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दुपारी पावसामुळे या परिसरात वर्दळ कमी होती, अन्यथा येथे मोठी जीवितहानी झाली असती. विशेषतः ही घटना जर सायंकाळच्या गर्दीच्या वेळी घडली असती, तर मात्र अत्यंत मोठा आणि भीषण अनर्थ ओढवला असता, अशी भीती प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रशांत मोरे हे आपली चारचाकी गाडी (क्रमांक एम एच ११ डी यु ८७८७) शॉपिंग सेंटरच्या आवारात लावून काही वेळापूर्वीच आपल्या ऑफिसमध्ये गेले होते. ते ऑफिसमध्ये पोहोचतात न पोहोचतात, तोच अचानक बाहेर झाड कोसळल्याचा प्रचंड मोठा आवाज झाला. त्यांनी तात्काळ ऑफिसबाहेर धाव घेतली असता, त्यांची आलिशान चारचाकी गाडी या महाकाय झाडाखाली पूर्णपणे दबलेली पाहायला मिळाली. या दुर्घटनेत त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तर याच झाडाखाली प्रताप कऱ्हाडकर यांच्या मालकीची एक दुचाकी (मोटारसायकल) देखील सापडली असून, तिचाही चक्काचूर झाला आहे.
पाचगणीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे येथील जमीन भुसभुशीत झाली असून, अनेक जुने व मोठे वृक्ष धोकादायक बनले आहेत. घटना घडताच स्थानिक नागरिक आणि पालिकेच्या आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत पडलेले झाड बाजूला करण्याचे काम सुरू केले. मात्र, या घटनेमुळे शहरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी दोन्ही वाहनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.



