पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी: जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आणि शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाचगणी शहरात गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या अतिवृष्टीमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक मुख्य रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहू लागले आहेत, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पाचगणी पालिकेचे नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांनी आज त्यांच्या संपूर्ण टीमसह शहरातील विविध भागांचा, विशेषतः ‘स्लम एरिया’चा वादळी दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली आणि आपत्कालीन यंत्रणेला तात्काळ कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.
नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे, नगरसेवक शेखर कासुर्डे, अमित कांबळे, नगरसेविका राजश्री सणस आणि आकाश बगाडे यांनी आज शहरातील रमाईनगर या झोपडपट्टी परिसराला प्रत्यक्ष भेट दिली. मुसळधार पावसामुळे या भागातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले होते. लोकप्रतिनिधींनी थेट नागरिकांच्या दारात जात त्यांचे सांत्वन केले आणि ज्या भागात नुकसान झाले आहे, तेथे तात्काळ मदत पोहोचवण्याचे आदेश पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिले.
पाचगणी हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्याने येथे देश-विदेशातील पर्यटक आणि निवासी शाळांचे हजारो विद्यार्थी वास्तव्यास असतात. हे लक्षात घेऊन रस्त्यावरील पाण्याचा निचरा करणे आणि पडलेली झाडे तातडीने बाजूला करून वाहतूक सुरळीत ठेवण्याला प्राधान्य दिले जात आहे. नगराध्यक्षांनी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना २४ तास हाय अलर्टवर राहून युध्दपातळीवर मदतकार्य करण्याचे आदेश दिले असून, नागरिकांना घाबरून न जाता पालिकेच्या आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.



