टेबल लँड नाका, राहिल प्लाझा व अर्थर रोड परिसर केला अडथळा मुक्त; राजलक्ष्मी पार्किंगचा वापर करण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे आवाहन
पाचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : पाचगणी शहरात गेल्या कित्येक दिवसांपासून दुरुस्तीच्या नावाखाली जुन्या गाड्या, भंगार व वापरात नसलेली वाहने मुख्य रस्त्यांवर पार्क करून ठेवल्यामुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पाचगणी पोलिसांनी धडक मोहीम राबवत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अशा अडथळा ठरणार्या वाहनांवर कठोर कारवाई केली असून शहरातील प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळे केले आहेत.
पाचगणी शहरातील टेबल लँड नाका ते राहिल प्लाझा या अत्यंत महत्त्वाच्या व गजबजलेल्या मार्गावर अनेक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला बिनधास्तपणे भंगार वाहने उभी करून ठेवण्यात आली होती. यामुळे रस्त्याचा मोठा भाग व्यापला जाऊन वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता. शहरात पर्यटकांची वर्दळ वाढल्यानंतर या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. अखेर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित वाहनधारकांना सूचना देऊन रस्त्यावरील हे सर्व अडथळे तात्काळ दूर केले. यासोबतच अर्थर रोड परिसरातही रस्त्यावर ठाण मांडून बसलेली वाहने हटवून हा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे.
पाचगणी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमुख पर्यटनस्थळ असल्याने सुट्टीच्या काळात व पर्यटन हंगामात शहरात हजारो पर्यटकांची वाहने दाखल होतात. अशा वेळी अनधिकृत पार्किंगमुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दल यांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही मार्ग मिळणे कठीण होते. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे आता वाहतूक सुरळीत झाली असून स्थानिक नागरिक व पर्यटकांतून समाधान व्यक्त होत आहे. पोलिसांनी नागरिकांना व दुकानदारांना रस्त्यावर वाहने न लावता ‘राजलक्ष्मी पार्किंग’च्या अधिकृत सुविधेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
कारवाई पुढेही सुरुच राहणार: सपोनि दिलीप पवार
“दुरुस्तीच्या नावाखाली जुन्या गाड्या, भंगार तसेच वापरात नसलेली वाहने रस्त्यावर पडून राहणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. नागरिकांनी व व्यावसायिकांनी रस्ते अडवून ठेवण्याऐवजी उपलब्ध शासकीय व अधिकृत पार्किंग सुविधेचा वापर करावा. शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अशा वाहनांवर आणि बेकायदेशीर पार्किंगवर यापुढेही पोलीस प्रशासनाकडून अशीच कठोर कारवाई सुरूच राहील.”
— दिलीप पवार (सहाय्यक पोलीस निरीक्षक, पाचगणी)



