पाचगणी:
उत्सव म्हणे केवळ डिजिटल रोषणाई आणि ढोल-ताशांचा गजर नसून, त्यातून समाजाच्या उपयोगी पडणारे कार्य घडणे म्हणजेच खरा उत्सव! याच उदात्त विचारांचा वारसा जपत पाचगणी येथील नामांकित श्री हनुमान मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला परिसरातील नागरिक आणि तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल ४५ सुजाण दात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
वाई येथील नामांकित ‘बेल एअर हॉस्पिटल’च्या विशेष तांत्रिक व वैद्यकीय सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सण-उत्सवांच्या काळात किंवा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयांमध्ये अनेकदा रक्ताचा तीव्र तुटवडा जाणवतो. अपघातग्रस्त रुग्ण, थॅलेसेमियाग्रस्त बालके आणि गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या रुग्णांसाठी वेळेवर रक्त मिळणे हे जीवन-मरणाचा प्रश्न असतो. हेच ओळखून श्री हनुमान मंडळाने नेहमीप्रमाणे सामाजिक भान जपत या शिबिराचे आयोजन केले होते. सकाळी शिबिराचा प्रारंभ उत्साहात झाला असून, तरुणांसोबतच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनीही या जीवनदायी उपक्रमात सहभाग नोंदवला.
हे शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी बेल एअर हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट सेवा पुरवली. तसेच श्री हनुमान मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य पांडुरंग कासुर्डे, उपाध्यक्ष रविकांत पांडुरंग गोळे, कार्याध्यक्ष रविंद्र सुधाकर कासुर्डे, सचिव क्षितीज किरण कासुर्डे आणि खजिनदार प्रमोद अमोल कासुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांनी, सर्व सभासदांनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी शिबिराच्या नियोजनासाठी दिवसभर अथक परिश्रम घेतले.
गणेशोत्सवासारख्या पवित्र पर्व काळात धार्मिक धार्मिक उपक्रमांसोबतच असा प्रत्यक्ष मानवसेवेचा वस्तुपाठ घालून दिल्याबद्दल श्री हनुमान मंडळाच्या या उपक्रमाचे पाचगणी शहर, वाई परिसर आणि राजकीय-सामाजिक वर्तुळातून विशेष कौतुक व अभिनंदन केले जात आहे.



