पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचवड: वाई तालुक्यातील पाचवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत असलेला घोडे बाजार सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील घोडेप्रेमी आणि व्यावसायिकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरत आहे. राजेशाही डौल, मजबूत बांधा, कमालीची चपळता आणि आकर्षक कान-ठेवणीसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘मारवाड’ (मारवाडी) जातीच्या घोड्यांना बाजारात मोठी मागणी असून, येथे दररोज लाखोंची आर्थिक उलाढाल होत आहे.
सध्या पाचवडच्या या ऐतिहासिक बाजारात सुमारे ५० हून अधिक घोड्यांची दावण सजली असून, त्यांची खरेदी-विक्री मोठ्या उत्साहात सुरू आहे. बाजारात आलेल्या घोड्यांची किंमत साधारणपणे ३ लाखांपासून तब्बल २० लाख रुपयांपर्यंत आहे. घोड्याची शुद्ध वंशावळ, त्याची उंची, रंग, चाल, धावण्याचा वेग, निष्णात प्रशिक्षण आणि शारीरिक सौष्ठव यावर त्याची अंतिम किंमत ठरवली जाते. राजस्थानची ओळख असलेल्या मारवाड घोड्यांसोबतच इतरही काही दर्जेदार जातींचे घोडे येथे दाखल झाल्याने खरेदीदारांना मोठा पर्याय उपलब्ध झाला आहे.
पाचवडच्या बाजाराचे नाव आता केवळ सातारा किंवा महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले नाही. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक यांसारख्या विविध राज्यांतील बडे व्यापारी व शौकीन खरेदीदार येथे दाखल होत आहेत. विशेषतः लग्नसमारंभ, भव्य मिरवणुका, चित्रपट चित्रीकरण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रशिक्षित व रुबाबदार घोड्यांना मोठी पसंती दिली जात आहे. आगामी दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या खरेदी-विक्रीला आणखी वेग येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
घोड्यांची खरेदी-विक्री पाहायला मिळण्यासोबतच परिसरातील नागरिक, विशेषतः तरुण आणि मुले घोड्यांचे फोटो अन् व्हिडिओ टिपण्यासाठी बाजारात गर्दी करत आहेत. वाढता प्रतिसाद आणि परराज्यातून येणारा व्यापारी वर्ग पाहता पाचवड बाजार समितीच्या वतीने या बाजाराला अधिक नियोजनबद्ध आणि भव्य स्वरूप देण्याच्या हालचाली सुरू आहेत. भविष्यात सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि कर्नाटकाला जोडणारे पाचवड हे राज्यातील सर्वात मोठे आणि प्रमुख ‘घोडे बाजार केंद्र’ म्हणून उदयास येईल, असा ठाम विश्वास व्यापारी व्यक्त करत आहेत.



