Home » पाटण » पाटण तालुक्यात खळबळ: उरुलमध्ये बनावट नोटांचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त; सरपंचासह पाच जणांवर गुन्हा, ५०० च्या नोटांसह ‘थार’ गाडी जप्त!

पाटण तालुक्यात खळबळ: उरुलमध्ये बनावट नोटांचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त; सरपंचासह पाच जणांवर गुन्हा, ५०० च्या नोटांसह ‘थार’ गाडी जप्त!

पांचगणी न्यूज नेटवर्क 

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील उरुल गावामध्ये बनावट भारतीय चलनी नोटा खपविण्याचा एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी थेट उरुलच्या विद्यमान सरपंचासह तब्बल पाच जणांच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, मुख्य संशयित आरोपी उरुलचा सरपंच नितीन निकम याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईत ५०० रुपयांच्या १७ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून, या कारवाईमुळे संपूर्ण सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत प्रचंड खळबळ उडाली आहे.

​या प्रकरणाची पाळेमुळे थेट कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचली असून आंतरजिल्हा बनावट नोटांचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, या प्रकरणातील पहिला संशयित आरोपी राजेंद्र गणपतराव थोरात (वय ४२, रा. उरुल, ता. पाटण) हा पोलिसांच्या रडारवर आला होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान त्याने या ५०० रुपयांच्या बनावट नोटा उरुलचा सरपंच नितीन जलदेव निकम (वय ४७) याच्याकडून घेतल्याची धक्कादायक कबुली दिली. सरपंचाचे नाव समोर येताच पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली.

​त्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार उरुल बस स्टँड परिसरात वेगाने हालचाली करत थेट छापा टाकला. या छाप्यात सरपंच नितीन निकम हा आणखी दोन संशयितांसह एका आलिशान महिंद्रा थार (क्र. MH 09 GZ 0089) या वाहनात संशयास्पद रित्या बसलेला आढळून आला. पोलिसांनी या तिघांनाही जागेवरच ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी सुरू केली. सुरुवातीला या संशयितांनी पोलिसांची दिशाभूल करत उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच सरपंच नितीन निकम याने पोपटासारखे बोलत सर्व गुपित उघड केले.

​सरपंचाने दिलेल्या कबुलीनुसार, या बनावट नोटा त्याने मनोज दशरथ निकम (वय ३६, रा. वर्धमान चौक, इचलकरंजी) आणि गौसपाक अब्दुलरज्जाक जमादार (वय ३९, रा. शिवाजीनगर, कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्याकडून घेतल्या होत्या. तसेच या नोटा बाजारात खपवून खऱ्या चलनात आणण्यासाठी त्याने त्या राजेंद्र थोरात याच्याकडे दिल्या होत्या. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मनोज निकम याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, या नोटांची मुख्य लिंक आशुतोष राऊत (रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) याच्याशी जोडलेली असल्याचे उघड झाले. त्यानेच या नोटा पुरवल्याचे समोर आले.

​दरम्यान, २ जुलै २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत राजेंद्र थोरात याच्या उरुल येथील राहत्या घरावर छापा टाकून झडती घेतली. घरातील बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर उघडले असता, पोलिसांना ५०० रुपयांच्या एकूण १७ बनावट नोटा सापडल्या. पोलिसांनी या सर्व नोटा आणि गुन्ह्यात वापरलेली थार गाडी जप्त केली आहे.

​या गंभीर आर्थिक गुन्ह्याप्रकरणी नितीन जलदेव निकम, मनोज दशरथ निकम, गौसपाक अब्दुलरज्जाक जमादार, आशुतोष राऊत आणि राजेंद्र गणपतराव थोरात या पाचही जणांविरुद्ध बनावट भारतीय चलनी नोटा तयार करणे, त्या बाळगणे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला खिळ घालण्याच्या उद्देशाने त्या चलनात खपविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कडक कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारे थेट सरपंचाचाच बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये सहभाग आढळल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. या बनावट नोटांचे जाळे आणखी कुठे कुठे पसरले आहे, या टोळीने आतापर्यंत बाजारात किती नोटा खपवल्या आहेत आणि मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आता कोल्हापूर आणि सांगली परिसरात पुढील तपास करत आहेत.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers