Home » पांचगणी » पारशी पॉईंटवर अज्ञात वाहनाच्या धडकेत भेकर अन्‌ पिल्लू ठार

पारशी पॉईंटवर अज्ञात वाहनाच्या धडकेत भेकर अन्‌ पिल्लू ठार

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पाचगणी : निसर्गसौंदर्याने नटलेल्या महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावरील प्रसिद्ध पारशी पॉईंट परिसरात गुरुवारी पहाटे एक दुर्दैवी घटना घडली. भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एका भेकराचा आणि त्याच्या पिल्लाचा जागीच मृत्यू झाला.

​गुरुवारी पहाटे नेहमीप्रमाणे व्यायामासाठी बाहेर पडलेले स्थानिक व्यावसायिक संतोष पिसाळ यांच्या ही घटना सर्वप्रथम निदर्शनास आली. रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले भेकर आणि त्याचे पिल्लू पाहून त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता दोन्ही मृतदेहांना तत्काळ रस्त्याच्या बाजूला केले, जेणेकरून मागाहून येणाऱ्या इतर वाहनांचा त्यांना पुन्हा फटका बसणार नाही. यानंतर पिसाळ यांनी लागलीच वन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

​माहिती मिळताच वन परिमंडळ अधिकारी कल्पना पताडे, वनरक्षक बिरू जावीर व वनसेवक संजय भिलारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मृत भेकरांचे शवविच्छेदन करून वन विभागाच्या नियमानुसार दफन करण्यात आले. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वन विभाग संबंधित वाहनाचा शोध घेत आहे.

​महाबळेश्वर-पाचगणी परिसर समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखला जातो. सध्या पाणी आणि अन्नाच्या शोधात वन्यप्राणी रस्त्याकडे येत आहेत. अशा वेळी वाहनांचा अमर्याद वेग त्यांच्या जिवावर बेतत आहे. वाहनचालकांनी वेग मर्यादित ठेवून सतर्कतेने वाहन चालवावे, असे आवाहन वनाधिकारी सुनील लांडगे यांनी केले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers