पाचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : वाहन खरेदी करून तब्बल चार महिने उलटले, खिशातून पूर्ण पैसे मोजले; पण हातात असलेल्या गाडीचे अधिकृत रजिस्ट्रेशनच झाले नसल्याचा धक्कादायक प्रकार महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथे समोर आला आहे. वाई येथील बजाज चेतकच्या अधिकृत ‘स्वामी मोटर्स’ आणि बजाज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे गोडवली येथील सौ. प्रमिला चव्हाण या महिला ग्राहकाची मोठी फसवणूक झाली असून, ग्राहकाकडून घेतलेले पैसे गेले कुठे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौ. प्रमिला चव्हाण यांनी २९ मे २०२६ रोजी वाई येथील ‘स्वामी मोटर्स’ या बजाज चेतकच्या अधिकृत शोरूममधून इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केली होती. वाहनाची खरेदी प्रक्रिया पूर्ण करून वाहनाचा ताबाही ग्राहकाकडे सोपवण्यात आला. मात्र, नियमानुसार तातडीने होणारे वाहनाचे आरटीओ (RTO) रजिस्ट्रेशन गेल्या चार महिन्यांपासून रखडले आहे. याबाबत चव्हाण यांनी स्वामी मोटर्सकडे वारंवार खेटे मारून पाठपुरावा केला; मात्र शोरूमचे चालक गणेश यांच्याकडून सातत्याने टाळाटाळ करण्यात आली.
संशय आल्याने चव्हाण यांनी स्वामी मोटर्स गाठले असता, संबंधित शोरूमचे मालक कार्यालय बंद करून पसार झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्यांनी थेट सातारा येथील बजाज चेतकच्या मुख्य अधिकृत केंद्राशी संपर्क साधला. तेथे मिळालेली माहिती धक्कादायक होती. ग्राहकाने वाई शोरूमला पूर्ण पैसे दिले असतानाही, स्वामी मोटर्सने त्या वाहनाची रक्कम बजाज कंपनीकडे जमाच केली नसल्याचा दावा सातारा केंद्राकडून करण्यात आला. कंपनीला पेमेंट न मिळाल्यानेच रजिस्ट्रेशन रोखल्याचे सांगण्यात आले.
ग्राहकाकडून रोख रक्कम उकळायची, गाडीचा ताबा द्यायचा आणि कंपनीला पैसे न देता शोरूम बंद करून पळ काढायचा, या प्रकारामुळे बजाज कंपनीच्या अधिकृत डीलरशिपवर आणि कंपनीच्या नियंत्रण व्यवस्थेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डीलर आणि कंपनीच्या या अंतर्गत घोळात व आर्थिक गैरव्यवहारात नाहक सर्वसामान्य महिला ग्राहक भरडली जात आहे. पैसे देऊनही गाडीचे अधिकृत कागदपत्रे व रजिस्ट्रेशन मिळत नसल्याने चव्हाण यांना गाडी रस्त्यावर चालवणे अशक्य झाले असून मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. याप्रकरणी बजाज कंपनी आणि स्वामी मोटर्सच्या मालकावर कठोर कारवाई करून आपल्याला न्याय व वाहनाचे कायदेशीर कागदपत्रे तातडीने मिळावीत, अशी जोरदार मागणी सौ. प्रमिला चव्हाण यांनी केली आहे.



