पांचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : सप्टेंबर अध्यापनातील नावीन्यपूर्ण प्रयोग आणि शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना समृद्ध करणारे बिरवाडी (ता. महाबळेश्वर) येथील सुपुत्र प्रा. श्रीकांत तुकाराम घाडगे यांना प्रतिष्ठित ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’ने गौरविण्यात आले आहे. पुणे येथील नामांकित ‘ग्लोबल एलिट (मीडिया अँड टेक)’ या संस्थेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील या उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कामगिरीची दखल घेत हा राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
पुणे येथील विमाननगर परिसरातील सिम्बायोसिस महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी (दि. ३० ऑगस्ट) अतिशय दिमाखदार वातावरणात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या प्रसंगी विविध क्षेत्रांतील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर आणि ‘ग्लोबल एलिट’ संस्थेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्याच शुभहस्ते प्रा. घाडगे यांना सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
’ग्लोबल एलिट’ या राष्ट्रीय संस्थेकडून दरवर्षी देशभरातील गुणवंत, ध्येयवादी आणि शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून आणणाऱ्या शिक्षकांचा शोध घेऊन त्यांना सन्मानित केले जाते. प्रा. श्रीकांत घाडगे यांनी गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत डिजिटल शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. कठीण विषयांचे सोप्या भाषेत सादरीकरण, अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य मेळ आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयोग अत्यंत यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या याच सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाची दखल घेत या राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.
प्रा. घाडगे यांना मिळालेल्या या उत्तुंग यशामुळे त्यांच्या मूळ गावी बिरवाडीसह संपूर्ण महाबळेश्वर परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका ग्रामीण भागातील शिक्षकाने राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद मानले जात आहे. या यशाबद्दल ग्रामस्थ, विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. प्रा. श्रीकांत यांच्या हातून शिक्षण क्षेत्रात असेच निरंतर आणि प्रेरणादायी कार्य घडत राहो, अशा शब्दांत श्री काळभैरव आणि आई रामवरदायिनीच्या चरणी प्रार्थना करत संपूर्ण परिसरातून त्यांच्या पुढील वाटचालीस उदंड शुभेच्छा दिल्या जात आहेत.



