Home » जावळी » बेलोशीत गणेशोत्सवात अवतरला ‘हरिश्चंद्रगड’; केदारेश्वर गुहा मंदिराच्या नयनरम्य देखाव्याने भाविक भारावले

बेलोशीत गणेशोत्सवात अवतरला ‘हरिश्चंद्रगड’; केदारेश्वर गुहा मंदिराच्या नयनरम्य देखाव्याने भाविक भारावले

पांचगणी न्यूज नेटवर्क

बेलोशी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक हरिश्चंद्रगडाचे अद्वितीय सौंदर्य आणि धार्मिक पावित्र्य यंदा बेलोशी ग्रामस्थांना प्रत्यक्ष अनुभवता येत आहे. येथील ‘श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बेलोशी’च्या वतीने यंदा गणेशोत्सवानिमित्त हरिश्चंद्रगडावरील प्रसिद्ध व प्राचीन ‘केदारेश्वर गुहा मंदिराचा’ अत्यंत नयनरम्य, भव्य आणि हुबेहूब देखावा साकारण्यात आला आहे. ऐतिहासिक वारसा, धार्मिक श्रद्धा आणि प्राचीन स्थापत्यकलेचा हा अप्रतिम संगम पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

​हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर गुहा हे भगवान शिवाचे एक अत्यंत रहस्यमय आणि पवित्र स्थान मानले जाते. भव्य गुहेच्या मध्यभागी स्थापित विशाल शिवलिंग, त्याभोवती वर्षभर साचलेले बर्फासारखे थंड पाणी आणि चार युगांचे प्रतीक मानले जाणारे चार खांब ही या मंदिराची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन, कलात्मकतेच्या जोरावर या पौराणिक स्थळाची प्रतिकृती बेलोशीत जिवंत केली आहे. देखाव्याच्या माध्यमातून भाविकांना केवळ श्रींच्या दर्शनाची पर्वणीच मिळत नसून महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडत आहे.

​या भव्य देखाव्यामुळे संपूर्ण बेलोशी परिसर आणि आसपासच्या गावांमध्ये भक्तिमय व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंडळाने साकारलेल्या या कलाकृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, परिसरातील नागरिकांनी, दुर्गप्रेमींनी आणि गणेशभक्तांनी या देखाव्याला भेट देऊन दर्शनाचा व कलेचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बेलोशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers