Home » भिलार » भिलार-दानवली रस्त्यावर महाकाय निलगिरीचे झाड कोसळले; वाहतूक तासनतास ठप्प, प्रशासनाच्या डोळेझाकपणामुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात!

भिलार-दानवली रस्त्यावर महाकाय निलगिरीचे झाड कोसळले; वाहतूक तासनतास ठप्प, प्रशासनाच्या डोळेझाकपणामुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात!

पांचगणी न्यूज नेटवर्क

भिलार : पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिलार आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून, ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. यातच भिलारहून दानवलीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर काल रात्री एक महाकाय निलगिरीचे झाड मुळासकट उपटून थेट रस्त्याच्या मध्यभागी आडवे कोसळले. रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. सुदैवाने ही दुर्घटना रात्री झाली, अन्यथा दिवसा हा प्रकार घडला असता तर मोठा अनर्थ ओढवला असता, अशी भीती व्यक्त होत आहे.

​झाड कोसळल्यामुळे दानवलीकडे जाणारी आणि भिलारकडे येणारी वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाची वाट न पाहता, स्थानिक ग्रामस्थ तातडीने पुढे आले. दुपारी ग्रामस्थांनी स्वतःच्या प्रयत्नांनी आणि अथक परिश्रमांनी हे भलेमोठे झाड कापून रस्त्याच्या बाजूला केले, त्यानंतरच या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू होऊ शकली.

​या घटनेमुळे भिलार-दानवली रस्त्यावरील धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मुख्य रस्त्यावर कित्येक वर्षांची जुनी आणि पोकळ झालेली निलगिरीची झाडे उभी आहेत, जी सध्या थेट मृत्यूला आमंत्रण देत आहेत. याच रस्त्यावरून दररोज शेकडो शाळकरी विद्यार्थी, नोकरदार आणि ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. “आम्ही प्रशासनाला या धोकादायक झाडांबाबत वारंवार निवेदने देऊनही संबंधित विभाग याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे. आमच्यासाठी दळणवळणाचा हा एकमेव मार्ग आहे. प्रशासनाने आता तरी जागे व्हावे आणि आमचा प्रवास निर्धोक करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल,” अशी संतप्त मागणी ग्रामस्थ विकास दानवले यांनी यावेळी केली. सातत्याने होणाऱ्या अशा घटनांमुळे आता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers