पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी: गणेशोत्सवाच्या औचित्याने सामाजिक बांधिलकी जपत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून आरोग्यदायी उपक्रम राबवणे ही अत्यंत स्तुत्य बाब आहे. याच भावनेतून ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ अंतर्गत आज, गुरुवारी (दि. २४ सप्टेंबर) भीमनगर येथील कृष्णाई गणेश उत्सव मंडळ येथे भव्य आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराला स्थानिक नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून सुमारे ९० ते १०० नागरिकांनी या उपक्रमाचा थेट लाभ घेतला.
प्राथमिक आरोग्य केंद्र पाचगणी आणि नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन व मार्गदर्शन नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे, आरोग्य सभापती तथा नगरसेविका राजश्री सनस आणि नगरसेवक आकाशदादा बगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व पुढाकाराने पार पडले.
या शिबिरादरम्यान नागरिकांसाठी मोफत ईसीजी (ECG), रक्तदाब (BP), आणि मधुमेह (शुगर) तपासणी करण्यात आली. गरजूंना आवश्यक औषधोपचार मोफत पुरवण्यात आले. यासोबतच बदलत्या जीवनशैलीत उत्तम आरोग्य कसे जपावे आणि संतुलित आहार कसा असावा, याविषयी उपस्थितांना वैद्यकीय तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
आरोग्य पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक एन. आर. बोऱ्हाडे, आरोग्य सेविका सुवर्णा निकम, आरोग्य सेविका जे. एन. पिसाळ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अश्विनी तनपुरे, मदतनिस निकाळजे ताई आणि सपकाळ ताई यांनी रुग्णसेवा देत शिबिर यशस्वी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृष्णाई गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष ओमकार घोडके, उपाध्यक्ष साहिल चव्हाण, खजिनदार रोहित भोसले, सचिव राहुल भोसले, सदस्य प्रतीक बगाडे आणि मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांनी या आरोग्य शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घेतली. या उपक्रमाबद्दल भीमनगर परिसरातील नागरिकांनी आरोग्य विभाग आणि कृष्णाई गणेश उत्सव मंडळाचे मनःपूर्वक आभार मानले.



