Home » महाबळेश्वर » भोसे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावर फुलले हसू; माजी केंद्रप्रमुख संभाजी भिलारे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप

भोसे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावर फुलले हसू; माजी केंद्रप्रमुख संभाजी भिलारे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप

पांचगणी न्यूज नेटवर्क

भोसे : शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांना शालेय प्रवासाच्या सुरुवातीलाच योग्य प्रोत्साहन मिळावे या सामाजिक भावनेतून भोसे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक विशेष उपक्रम पार पडला. माजी केंद्रप्रमुख तथा शिवसेनेचे महाबळेश्वर तालुका प्रमुख संभाजी भिलारे यांच्या वतीने इयत्ता पहिली व दुसरीच्या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. शालेय जीवनाच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या पाठबळामुळे विद्यार्थी व पालकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

​कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजित करण्यात साहित्य वाटप सोहळ्यात बोलताना प्रमुख पाहुणे संभाजी भिलारे यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, प्राथमिक शिक्षण हाच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आणि समृद्ध भविष्यांचा मुख्य पाया असतो. विशेषतः ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधून शिकणारी मुले अत्यंत हुशार आणि जिद्दी असतात, फक्त त्यांना योग्य वेळी प्रोत्साहन आणि साधनांची गरज असते. आपल्या भागातील एकही विद्यार्थी साहित्याअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये, याच हेतूने आपण सामाजिक बांधिलकी जपत हा छोटासा प्रयत्न केला असल्याचे भिलारे यांनी सांगत, भविष्यातही भोसे शाळेच्या पाठीशी आपण सदैव भक्कमपणे उभे राहू अशी ग्वाही दिली.

​यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राम गोळे यांनी मनोगत व्यक्त करताना संभाजी भिलारे यांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. ते म्हणाले की, जिल्हा परिषद शाळा सक्षमीकरणामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरतो. संभाजी भिलारे यांनी केवळ राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातच नव्हे, तर शैक्षणिक क्षेत्रातही नेहमीच पुढाकार घेतला आहे. माजी केंद्रप्रमुख म्हणून त्यांचा शैक्षणिक क्षेत्रातील मोठा अनुभव आहे आणि आजही त्यांनी दाखवलेली ही तत्परता संपूर्ण गावासाठी आणि शाळेसाठी अत्यंत भूषणावह आहे, अशा शब्दांत त्यांनी आभार मानले.

​शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता ढेबे यांनी उपस्थितांचे स्वागत करत शाळेच्या प्रगतीचा पट मांडला. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या की, इयत्ता पहिली आणि दुसरीतील लहान मुलांना जेव्हा अशा प्रकारे प्रोत्साहन मिळते, तेव्हा त्यांच्या मनात शाळेबद्दल अधिक गोडी निर्माण होते. शैक्षणिक साहित्यामुळे मुलांच्या अभ्यासाला नवी गती मिळेल. लोकप्रतिनिधी आणि समाजधुरीण जेव्हा शाळेच्या मदतीला पुढे येतात, तेव्हा शिक्षकांचाही उत्साह द्विगुणित होतो, असे सांगत त्यांनी भिलारे यांच्या या दातृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

​या अत्यंत उत्साही वातावरणात पार पडलेल्या कार्यक्रमात गणेश पांगारे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ, पालक आणि अंगणवाडी ताई पुष्पा गोळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक वृंद अमित कारंडे, आनंदा पारठे, कविता नेवसे, उस्मान तांबोळी, आणि अर्चना बगाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

​संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अमित कारंडे यांनी केले, तर उपस्थितांचे व मार्गदर्शकांचे आभार शिक्षिका कविता नेवसे यांनी मानले. उपक्रमाच्या शेवटी लहानग्यांच्या हातात शैक्षणिक साहित्य आणि खाऊ मिळताच मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हाच या कार्यक्रमाचा खरा यशोगाथा ठरला.

 

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers