Home » महाबळेश्वर » महाबळेश्वरच्या जंगलात निसर्गाचा चमत्कार; १२५ वर्षांनंतर ‘पिनालिया’चा पुनर्शोध, तर ‘ओबेरोनिया’ची राज्यात पहिलीच नोंद ​तरुण संशोधकांच्या पथकाला ‘दुहेरी यश’; पश्चिम घाटाच्या जैवविविधतेत मानाचा तुरा

महाबळेश्वरच्या जंगलात निसर्गाचा चमत्कार; १२५ वर्षांनंतर ‘पिनालिया’चा पुनर्शोध, तर ‘ओबेरोनिया’ची राज्यात पहिलीच नोंद ​तरुण संशोधकांच्या पथकाला ‘दुहेरी यश’; पश्चिम घाटाच्या जैवविविधतेत मानाचा तुरा

पांचगणी न्यूज नेटवर्क

​महाबळेश्वर : जागतिक जैवविविधतेचा ‘हॉटस्पॉट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम घाटाच्या समृद्ध वैभवात आणखी एक अत्यंत मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील वाडा-कुंभरोशी परिसरातील घनदाट जंगलात वनस्पती संशोधकांना दुर्मिळ ऑर्किड संदर्भात एक अभूतपूर्व ‘दुहेरी यश’ मिळाले आहे. ब्रिटिश काळात नोंद झालेल्या आणि त्यानंतर गेल्या १२५ वर्षांपासून गायब असलेल्या ‘पिनालिया म्हैसूरएन्सिस’ या ऑर्किड प्रजातीचा महाराष्ट्रात पुनर्शोध लागला असून, ‘ओबेरोनिया चंद्रशेखराणी’ या अत्यंत दुर्मिळ स्थानिक ऑर्किडची महाराष्ट्रातून पहिल्यांदाच अधिकृत नोंद झाली आहे. या दोन्ही ऐतिहासिक शोधामुळे महाबळेश्वरच्या निसर्गसंपदेची जागतिक पातळीवरील ओळख पुन्हा एकदा गडद झाली आहे.

 

​भारतीय वनस्पती सर्वेक्षण (BSI) चे डॉ. जीवन सिंह जलाल यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण संशोधक सागर दिलीप कुलकर्णी, यसस्विनी राऊत, आकाश तानाजी राऊत, मयुरेश प्रशांत कुळकर्णी आणि शर्विल अनिल बिडकर या पथकाने हे महत्त्वपूर्ण शोधकार्य यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. या संशोधनातील ‘ओबेरोनिया चंद्रशेखराणी’ संदर्भातील शोधनिबंध ‘बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया’च्या ‘Nelumbo’ या प्रतिष्ठित नियतकालिकात, तर ‘पिनालिया म्हैसूरएन्सिस’चा शोधनिबंध नुकताच ४ जुलै २०२६ रोजी ‘International Journal of Botany Studies’ मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

​ऑर्किड या वनस्पती प्रामुख्याने दुसऱ्या मोठ्या झाडांच्या फांद्यांवर (Epiphytes) किंवा खडकांवर वाढतात. या वनस्पती हवेतील ओलावा शोषून घेतात आणि इतर झाडांना कोणतीही इजा न पोहोचवता केवळ आधारासाठी त्यांचा वापर करतात. वातावरणातील बदलांना त्या अत्यंत संवेदनशील असतात. त्यामुळे एखाद्या जंगलात ऑर्किडचे अस्तित्व असणे, हे तिथले पर्यावरण आणि हवामान अत्यंत शुद्ध व निरोगी असल्याचे उत्तम लक्षण मानले जाते.

​महाबळेश्वरच्या जंगलात वनभ्रमंती करत असताना या तरुण संशोधकांना एका जुन्या आंब्याच्या झाडावर ऑर्किडची एक वेगळी वनस्पती आढळून आली होती. संशोधकांनी दीर्घकाळ या वनस्पतीचे बारकाईने निरीक्षण केले. तिला फुले आल्यानंतर तिचे नमुने गोळा करून शास्त्रीय पडताळणी केली असता, ती ‘पिनालिया म्हैसूरएन्सिस’ (म्हैसूर इरिया) असल्याचे सिद्ध झाले. विशेष म्हणजे, महाबळेश्वरमध्ये या प्रजातीची शेवटची नोंद ब्रिटिश काळात सन १९०० मध्ये झाली होती. त्यानंतर सलग सव्वाशे वर्षे ही वनस्पती राज्यात कुठेही न आढळल्याने ती नामशेष झाली असावी, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, १२५ वर्षांनंतर लागलेल्या या पुनर्शोधामुळे वनस्पतिशास्त्रज्ञांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याच मोहिमेत महाराष्ट्रात प्रथमच आढळलेल्या ‘ओबेरोनिया चंद्रशेखराणी’मुळे राज्याच्या वनसंपदेत एका मौल्यवान प्रजातीची भर पडली आहे.

​दरम्यान, आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाने (IUCN) ‘ओबेरोनिया चंद्रशेखराणी’ या प्रजातीला ‘असुरक्षित’ श्रेणीत समाविष्ट केले आहे. सद्यस्थितीत ‘पिनालिया’ धोक्याबाहेर असली, तरी महाबळेश्वर परिसरातील वाढते नागरीकरण, जंगलांचे विखंडीकरण आणि मानवी हस्तक्षेपामुळे या दुर्मिळ वनस्पतींच्या मूळ अधिवासाला मोठा धोका निर्माण झाला आहे. पश्चिम घाटाच्या पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरलेल्या या दोन्ही वनस्पतींचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांच्या अधिवासाचे तातडीने संवर्धन करण्याची गरज आता पर्यावरण अभ्यासक आणि संशोधकांकडून व्यक्त होत आहे.

 

 

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers