पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित (एसडीसी) बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठीच्या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली असून, महाबळेश्वर तालुक्यातील विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते, ‘सहकार रत्न’ राजेंद्रशेठ राजपुरे तसेच सौ. रूपालीताई राजेंद्रशेठ राजपुरे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महाबळेश्वरच्या सहकार अन् सामाजिक वर्तुळात या अर्जांमुळे राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच राज्यसभेचे खासदार नितीनकाका पाटील यांच्या खंबीर नेतृत्वाखाली व आशीर्वादाने हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. महाबळेश्वर तालुक्यातील सहकार चळवळ अधिक मजबूत करणे, तळागाळातील शेतकऱ्यांना तसेच विकास सेवा सोसायट्यांना बँकेच्या माध्यमातून सक्षम न्याय मिळवून देणे आणि तालुक्याचा सहकार क्षेत्रात दबदबा कायम राखणे या उद्देशाने हे अर्ज भरण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
राजेंद्रशेठ राजपुरे व सौ. रूपालीताई राजपुरे यांच्या अर्ज दाखल करण्याच्या प्रसंगी महाबळेश्वर व पाचगणी परिसरातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. यामध्ये पाचगणीचे नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे, सहकार बोर्डाचे संचालक महादेव दुधाने, धोंडीराम जंगम, सभापती शकुंतला चोरमले, सदस्या वंदनाताई भिलारे, प्रवीण भिलारे, लक्ष्मण बावळेकर, आर. डी. मालुसरे, संतोष आंब्राळे, सचिन उत्तेकर, घनश्याम सपकाळ, चंद्रशेखर बावळेकर, पाचगणीचे नगरसेवक शेखर कासुर्डे, राजेंद्र पारठे, प्रकाश गोळे, नारायण बिरामणे, संजय देसाई, विठ्ठल दुधाने, सुनील मालुसरे, विलास राजपुरे, बंडा राजपुरे, अभय डोईफोडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रमुख कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक ही संपूर्ण जिल्ह्याच्या अर्थकारणाची आणि सहकाराची धुरा सांभाळणारी अत्यंत महत्त्वाची निवडणूक मानली जाते. अशा स्थितीत महाबळेश्वर तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून राजेंद्रशेठ राजपुरे आणि सौ. रूपालीताई राजपुरे यांच्या उमेदवारीमुळे तालुक्यातील सहकार क्षेत्रातील गणिते अधिक रंजक बनली असून, स्थानिक पातळीवर या उमेदवारीचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.



