पांचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : पर्यटनाची जागतिक राजधानी असलेल्या महाबळेश्वरच्या मुख्य बस स्थानकातून एक अत्यंत संतापजनक आणि शासकीय यंत्रणेला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या एसटी महामंडळाच्या एका मुजोर वाहतूक निरीक्षकाने (Traffic Inspector) आपल्या पदाची आणि कर्तव्याची सर्व संकेत पायदळी तुडवत प्रवाशांशी हुज्जत घातली, इतकेच नव्हे तर प्रवाशांची बाजू घेऊन सनदशीर मार्गाने जाब विचारणाऱ्या पत्रकारांना अत्यंत नीच पातळीवर जाऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेचा अशा प्रकारे जाहीर अनादर झाल्याने संपूर्ण सातारा जिल्हाभरातील पत्रकार वर्ग आणि प्रवाशांमधून तीव्र संतापाची लाट उसळली असून, संबंधित मुजोर अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
महाबळेश्वर एसटी आगाराची विस्कळीत झालेली घडी बसवण्यासाठी सध्या वरिष्ठ पातळीवर विविध प्रयत्न सुरू असताना, स्थानिक पातळीवरील काही अधिकारी मात्र या प्रयत्नांना हरताळ फासत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. महाबळेश्वर बस स्थानकातून सुटणारी एक महत्त्वाची बस आपल्या नियोजित वेळेपेक्षा तब्बल अर्धा ते पाऊण तास उशिराने उभी होती. एसटीच्या या नेहमीच्या ‘लेटमार्क’मुळे स्थानकात ताटकळत थांबलेल्या अबालवृद्ध प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अनेक प्रवाशांचे पुढील प्रवासाचे (Connecting Journey) आरक्षण असल्याने त्यांचा नियोजित प्रवास धोक्यात आला होता. तासन्तास थांबूनही गाडी सुटत नसल्याने संतप्त प्रवाशांनी जेव्हा संबंधित वाहतूक निरीक्षकाकडे याबाबत विचारणा केली, तेव्हा या अधिकाऱ्याने प्रवाशांची अडचण समजून घेण्याऐवजी किंवा त्यांना सौजन्याची वागणूक देण्याऐझवी थेट अरेरावी आणि हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
याच बसमधून प्रवास करणारे स्थानिक पत्रकार बांधव प्रवाशांची होणारी हेळसांड पाहून त्या ठिकाणी गेले. त्यांनी प्रवाशांच्या वतीने अत्यंत सनदशीर आणि कायदेशीर मार्गाने संबंधित अधिकाऱ्याला गाडी उशिरा सुटण्याचे कारण विचारले. मात्र, आधीच सत्तेची आणि पदाची नशा डोक्यात गेलेल्या त्या मुजोर वाहतूक निरीक्षकाचा पारा चढला. पत्रकारांचा आणि त्यांच्या लोकशाहीतील अधिकारांचा सन्मान राखणे तर दूरच, उलट त्या अधिकाऱ्याने सर्व मर्यादा ओलांडून पत्रकारांशीच अत्यंत उद्धटपणे वाद घालत थेट अर्वाच्य आणि घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सार्वजनिक ठिकाणी शासकीय गणवेशात असताना एका जबाबदार अधिकाऱ्याने केलेले हे वर्तन एखाद्या गुंडालाही लाजवणारे होते.
विशेष आणि अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, याच महाबळेश्वरमधील पत्रकार बांधवांनी काही दिवसांपूर्वीच महाबळेश्वर एसटी प्रशासनाच्या चांगल्या आणि सकारात्मक कामांची दखल घेऊन वृत्त प्रसिद्ध केले होते, ज्यामुळे आगाराची प्रतिमा उंचावली होती. एसटी प्रशासनाला नेहमी सहकार्य करणाऱ्या याच पत्रकारांना आज अशा प्रकारे शासकीय मुजोरीचा आणि शिवीगाळीचा सामना करावा लागल्याने, “उपकाराची जाण न ठेवता दाखवलेली ही दादागिरी” आता संपूर्ण तालुक्यात आणि जिल्हाभरात प्रचंड चर्चेचा आणि संतापाचा विषय बनली आहे. पर्यटनासाठी येणाऱ्या लाखो पर्यटकांसमोर महाबळेश्वर एसटी प्रशासनाची यामुळे नाचक्की झाली आहे
एसटी महामंडळाचे ब्रीदवाक्य ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे आहे, परंतु महाबळेश्वर बस स्थानकातील हा प्रकार पाहता येथे ‘प्रवाशांच्या छळासाठी’ असा कारभार सुरू आहे की काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. या मुजोर वाहतूक निरीक्षकाच्या अशा वागणुकीमुळे संपूर्ण एसटी महामंडळाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. आता एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी या अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्याची पाठराखण करून प्रकरणावर पडदा टाकतात, की त्याच्यावर थेट निलंबनाची (Suspension) कडक कारवाई करून पत्रकारांना आणि प्रवाशांना न्याय देतात, याकडे महाबळेश्वरमधील नागरिक, प्रवासी संघटना आणि संपूर्ण पत्रकार वर्गाचे बारीक लक्ष लागून राहिले आहे. जर तात्काळ कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पत्रकार संघटनांकडून देण्यात आला आहे.



