पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या महाबळेश्वर तालुक्याच्या शांत हवेत सध्या राजकीय उष्णता भलतीच वाढली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एसडीसीसी) २०२६ च्या हायव्होल्टेज निवडणुकीमुळे तालुक्याचे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून सलग दोन वेळा बिनविरोध निवडून येत सहकारातील आपली ताकद सिद्ध करणारे विद्यमान संचालक राजेंद्र शेठ राजपुरे हे यंदा बिनविरोध ‘हॅटट्रिक’ साधणार की त्यांना संघर्षाच्या मैदानात उतरावे लागणार? या एकाच प्रश्नाने महाबळेश्वरसह संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात गेल्या काही वर्षांत शिवसेनेने आपली पाळेमुळे मजबूत करत राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचे जोरदार प्रयत्न चालवले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये उमटलेले याच सत्तासंघर्षाचे पडसाद आता थेट जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमटू लागले आहेत. या निवडणुकीत राजेंद्र शेठ राजपुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या पत्नी सौ. रूपालीताई राजपुरे यांनीही अर्ज भरला आहे. मात्र, महाबळेश्वर पंचायत समितीचे उपसभापती संजय मोरे यांनी तगडे आव्हान उभे करत उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय समीकरणांची उलथापालथ झाली आहे.
एकेकाळी स्व. बाळासाहेब भिलारे यांच्याकडे दीर्घकाळ असणारे जिल्हा बँकेचे नेतृत्व राजेंद्र शेठ राजपुरे यांनी आपल्या मुत्सद्दीपणाने आणि कौशल्याने स्वतःकडे खेचून आणले होते. सहकारातील सर्वसमावेशक कार्य, थेट संपर्क आणि सभासदांशी जपलेले घट्ट नाते याच्या जोरावर त्यांनी सलग दोन टर्म बिनविरोध बाजी मारली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत राजकीय ईर्ष्या टोकाला पोहोचली आहे. वरिष्ठ पातळीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील राजकीय तडजोडींच्या चर्चा सुरू असल्या, तरी स्थानिक पातळीवर मात्र निवडणुकीची रणधुमाळी उडाली आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राजकीय नेत्यांच्या दारी ‘जोर-बैठका’ सुरू झाल्या होत्या, तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर काही मतदार अचानक ‘सहलीवर’ गेल्याने राजकीय गांभीर्य आणि सस्पेन्स अधिकच वाढला आहे.
शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असलेल्या या बँकेत आपला प्रतिनिधी पाठवण्यासाठी राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते निष्ठेची पराकाष्ठा करत आहेत. एका बाजूला राजेंद्र शेठ राजपुरे यांची सहकारातील दीर्घ कारकीर्द, जनसंपर्क आणि बिनविरोध निवडून येण्याची परंपरा पणाला लागली आहे, तर दुसऱ्या बाजूला नव्या नेतृत्वाची आकांक्षा धरून संजय मोरे यांनी दिलेले रोखठोक आव्हान आहे. वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीने यातून बिनविरोधचा तोडगा निघणार की महाबळेश्वरचा राजकीय पट रणसंग्रामात बदलणार, याचा फैसला आता काही दिवसांतच होणार आहे.



