पांचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी उडाली असून, महाबळेश्वर तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातील लढत कमालीची रंगतदार आणि प्रतिष्ठेची बनली आहे. या मतदारसंघात केवळ १२ मतदार असल्याने प्रत्येक मताला सुवर्णासारखे मोल प्राप्त झाले आहे. महायुती सरकारमध्ये राज्यात एकत्र सत्तेत असलेले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट या निवडणुकीत मात्र परस्परांविरोधात ठाकले आहेत. शिंदे गटाचे संजय मोरे ‘प्रेशर कुकर’ चिन्हावर, तर अजित पवार गटाच्या रूपाली राजपुरे ‘टेबल’ या चिन्हावर आमनेसामने आल्याने या १२ मतदारांची निष्ठा नेमकी कोणाच्या पारड्यात झुकणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्षपद आणि सहकार क्षेत्रातील सत्ता केंद्र मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत महाबळेश्वर तालुक्याची ही लढत केवळ सहकारापुरती मर्यादित न राहता राजकीय वर्चस्वाची बनली आहे. ‘प्रेशर कुकर’ चिन्हावर नशीब आजमावणारे संजय मोरे हे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. महाबळेश्वर पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम करताना त्यांनी अत्यंत कमी कालावधीत तालुक्यात स्वतःचा चांगला राजकीय प्रभाव निर्माण केला आहे. त्यांच्या या शासकीय पदाचा अनुभव आणि स्थानिक पातळीवरील थेट संपर्क त्यांच्या पाठीशी असला, तरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आवश्यक असलेल्या अवघ्या १२ मतांची जुळवाजुळव करणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
दुसऱ्या बाजूला, ‘टेबल’ चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरलेल्या रूपाली राजपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि सहकार क्षेत्रातील आपल्या जुन्या कौटुंबिक अनुभवाच्या जोरावर भक्कम मोर्चेबांधणी केली आहे. रूपाली राजपुरे यांनी स्वतः महाबळेश्वर पंचायत समितीचे सभापती म्हणून यशस्वीपणे काम पाहिले आहे. विशेष म्हणजे, त्यांचे पती राजेंद्रशेठ राजपुरे हे सातारा जिल्हा बँकेचे सलग तीन टर्म संचालक राहिले असून सहकार क्षेत्रात त्यांचा दांडगा दबदबा आहे. या प्रदीर्घ अनुभवाचा आणि दांडग्या जनसंपर्काचा मोठा ‘बोनस’ सध्या रूपालीताई राजपुरे यांच्या विजयासाठी अत्यंत मोलाचा ठरताना दिसत आहे.
राज्यात आणि जिल्ह्यात महायुती म्हणून एकत्र काम करणाऱ्या दोन महत्त्वाच्या पक्षांचे उमेदवारच एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांची ही मोठी कसोटी ठरणार आहे. ही निवडणूक केवळ पक्षीय चिन्हावर न होता सहकार क्षेत्रातील वैयक्तिक संबंध आणि उमेदवारांची पोहोच यावरच अधिक आधारित असणार आहे. त्यामुळे १२ प्रतिनिधींपैकी कोणाच्या पाठीशी किती मतदार ठामपणे उभे राहतात आणि ऐन मतदानाच्या वेळी कोणती गणिते आकाराला येतात, यावरच विजयाचे पारडे ठरेल. अत्यल्प मतदारसंख्या असल्यामुळे अगदी एका एका मताचा फरक निकाल फिरवू शकतो. या राजकीय आणि सहकारातील हायव्होल्टेज लढतीत ‘प्रेशर कुकर’ची शिट्टी वाजणार की ‘टेबल’वर विजयाची मोहोर उमटणार, याचा फैसला आता मतदानातूनच होणार आहे.



