Home » कराड » महावितरणच्या सबस्टेशनमध्ये बिबट्याचा मृत्यू – तासवडे एमआयडीसीतील घटना

महावितरणच्या सबस्टेशनमध्ये बिबट्याचा मृत्यू – तासवडे एमआयडीसीतील घटना

पांचगणी न्यूज नेटवर्क

उंब्रज : तासवडे एमआयडीसीतील महावितरणच्या विद्युत सबस्टेशनमध्ये विद्युत यंत्रणेवर उडी मारल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. 29) पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, औद्योगिक क्षेत्रात बिबट्यांचा वाढता वावर पुन्हा एकदा समोर आला आहे.

पहाटे अचानक सबस्टेशनमध्ये जोरदार स्पार्किंग होऊन मोठा आवाज झाला. त्यामुळे रात्रपाळीवरील कर्मचाऱ्यांनी तातडीने पाहणी केली असता, एमआयडीसीच्या चार फीडरच्या आयसोलेटरजवळ विद्युत तारा व यंत्रणेमध्ये बिबट्या अडकून मृत झाल्याचे निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांनी त्वरित वनविभागाला याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास मृत बिबट्याला खाली उतरविण्यात आले. वनविभागाने पंचनामा करून मृत बिबट्यावर नियमानुसार अंत्यसंस्कार केले.

तासवडे एमआयडीसी परिसरातील तळबीड, वराडे, वनवासमाची, वसंतगड परिसरातील ऊस शेतीमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दिसून येत आहे. अनेक वेळा दोन ते तीन बिबटे एकत्रितपणे भक्षांच्या शोधात फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. अनेक औद्योगिक कंपन्यांच्या परिसरातही बिबटे शिरल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

विशेष म्हणजे, अवघ्या वीस दिवसांपूर्वी या सबस्टेशनसमोरील एका केमिकल बनवणाऱ्या कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ बिबट्याचा मुक्त वावर सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. त्यामुळे वनविभागाने या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज पुन्हा निर्माण झाली आहे.

दरम्यान, यापूर्वीही या परिसरात बिबट्यांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता महावितरणच्या उच्चदाब विद्युत यंत्रणेत अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याने वन्यजीवांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

फोटो: तासवडे एमआयडीसीतील सबस्टेशन मध्ये बिबट्याने विद्युत यंत्रनेवर उडी घेतल्याने शाॅक लागून त्याचा मृत्यू झाला.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers