पांचगणी न्यूज नेटवर्क
हुमगाव : हातगेघर विकास सेवा सोसायटीच्या रद्द झालेल्या ठरावावरून जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी केलेले सर्व आरोप पूर्णपणे चुकीचे, बिनबुडाचे आणि केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केलेले आहेत. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात कोणतीही धरपकड किंवा फरफटीचा प्रकार घडलेला नसून, मानकुमरे यांनी स्वतःच्या आत्मकेंद्रित राजकारणासाठी मीडियाला चुकीची माहिती दिली आहे, असा थेट हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे जावली तालुका माजी अध्यक्ष श्रीहरी तुकाराम गोळे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली बाजू मांडत मानकुमरे यांच्या राजकारणाचा खरपूस समाचार घेतला आहे.
घटनेचा सविस्तर तपशील देताना गोळे यांनी सांगितले की, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष साखरे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे ‘सेवा अभियान’ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री विक्रम पावसकर, आमदार धैर्यशील कदम, सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. बैठकीदरम्यान महू-हातगेघर धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत जनजागर प्रतिष्ठान आणि भाजप उद्योजक आघाडीचे माजी अध्यक्ष दीपक गावडे निवेदने देत असताना, वसंतराव मानकुमरे यांनी तिथे येत ओ.एस.डी. साखरे यांना निवेदने न स्वीकारण्याची विनंती केली. तसेच हातगेघर सोसायटीत विरोध केल्याचा आक्षेप घेत मानकुमरे यांनी थेट अंगावर धावून येत धमकी दिल्याचा दावा गोळे यांनी केला आहे.
या प्रसंगी मानकुमरे यांना उत्तर देताना गोळे म्हणाले की, सहागाव पंचक्रोशीतील सोसायटी सदस्यांना विश्वासात न घेतल्यामुळेच त्यांना सूचक आणि अनुमोदक मिळाला नाही. पक्षाच्या वरिष्ठांनी सामंजस्याने बैठक घेऊन मतभेद मिटवण्याच्या सूचना दिल्या असतानाही मानकुमरे यांनी एकाधिकारशाही करत दमदाटीचा मार्ग अवलंबला. तसेच नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीशी छुपी युती करून भाजपच्या जागा पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला, असा गंभीर आरोपही गोळे यांनी या वेळी केला. दोन्ही बाजूंच्या शाब्दिक चकमकीनंतर संघटन मंत्री विक्रम पावसकर यांनी हस्तक्षेप करत भाजप हा शिस्तीचा पक्ष असून सर्वांनी पक्षाची शिस्त पाळली पाहिजे, अशा शब्दांत सुनावले. त्यानंतर मानकुमरे अपशब्द वापरत तिथून निघून गेल्याचे गोळे यांनी नमूद केले.
हातगेघर आणि सहागाव पंचक्रोशीतील सदस्यांनी सोसायटी निवडणुकीवर बहिष्कार टाकून मानकुमरे यांची दडपशाही उखडून लावली आहे. संभाव्य जावली-महाबळेश्वर मतदारसंघाच्या फेररचनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मानकुमरे हे तालुक्यातील भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना पक्षापासून दूर ठेवण्याचा कुटील डाव आखत आहेत, असा घणाघातही त्यांनी केला. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अशा प्रवृत्तींना वेळीच वेसण घालावी आणि पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, अशी आग्रही विनंती श्रीहरी गोळे यांनी भाजप वरिष्ठांकडे केली आहे.



