Home » मेढा » -मार्ली-भिलार घाटात दरड कोसळली; महाबळेश्वर-जावली जोडणारा प्रमुख मार्ग ठप्प!

-मार्ली-भिलार घाटात दरड कोसळली; महाबळेश्वर-जावली जोडणारा प्रमुख मार्ग ठप्प!

पांचगणी न्यूज नेटवर्क 

मेढा: मेढा-मार्ली मार्गे भिलार जाणाऱ्या घाट रस्त्यावर काल रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास भीषण दरड कोसळल्याची घटना घडली आहे. डोंगराचा भलामोठा कडा आणि मातीचा मोठा ढिगारा थेट रस्त्यावर आल्याने या मार्गावरील संपूर्ण वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. घटना घडली ती वेळ रात्रीची असल्याने सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही, परंतु यामुळे या भागातील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

​महाबळेश्वर आणि जावली या दोन महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणारा हा अतिशय जवळचा आणि सोयीचा मार्ग मानला जातो. दररोज या मार्गावरून स्थानिक ग्रामस्थ, चाकरमाने आणि पर्यटक मोठ्या संख्येने ये-जा करत असतात. परंतु, काल रात्री दरड कोसळल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला असून रस्ता मार्गस्थ होणे अशक्य झाले आहे. प्रशासनाकडून आणि स्थानिक पोलिसांकडून या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि वाहनधारकांना या रस्त्याने न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

​सततच्या मुसळधार पावसामुळे डोंगराचा भाग खचून ही दरड कोसळल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. रस्ता बंद झाल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या असून पर्यटकांसह स्थानिकांचे मोठे हाल होत आहेत.

​दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून संबंधित प्रशासनाने, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे तात्काळ जेसीबी आणि आपत्कालीन यंत्रणा पाचारण करून ही दरड बाजूला करावी, अशी तीव्र मागणी जोर धरत आहे. लवकरात लवकर रस्ता सुरक्षित आणि मोकळा करून वाहतूक पूर्ववत करावी, अशी विनंती नागरिकांकडून केली जात आहे.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers