पांचगणी न्यूज नेटवर्क
कराड : नागपूर येथे आयोजित ‘संविधान सन्मान यात्रा’दरम्यान युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि कराडचे सुपुत्र शिवराज मोरे यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कथित लाठीहल्ला व गळा आवळण्याच्या घटनेचे तीव्र पडसाद कराड शहरात उमटले आहेत. या हिंसक कारवाईच्या निषेधार्थ कराड युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी सायंकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सरकार आणि पोलिस प्रशासनाविरोधात तुफान निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने मनुस्मृतीच्या निषेधार्थ आणि संविधानाच्या रक्षणासाठी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयाकडे ‘संविधान सन्मान यात्रा’ काढण्यात आली होती. ही सनदशीर मार्गाने जाणारी यात्रा रोखताना पोलिसांनी प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर अमानुष बळकावा करत हल्ला केल्याचा थेट आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे कराडात पसरताच स्थानिक युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले.
सायंकाळी सातच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकवटलेल्या कार्यकर्त्यांनी ‘संविधान जिंदाबाद’, ‘मनुस्मृतीचा धिक्कार असो’, ‘नही चलेगी, नही चलेगी, तानाशाही नही चलेगी’, आणि ‘जब जब फडणवीस डरता है, पुलिस को आगे करता है’ अशा गगनभेदू घोषणांनी संपूर्ण परिसर ढवळून काढला. हातात संविधानाच्या प्रति व निषेधाचे फलक घेऊन आंदोलकांनी महायुती सरकारच्या दडपशाही वृत्तीचा तीव्र निषेध नोंदवला.
यावेळी आक्रमक भूमिका मांडताना दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले, “कराडच्या सुपुत्रावर आणि युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर झालेला हा हल्ला म्हणजे लोकशाहीचा थेट खून आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या शिवराज मोरेंचा पोलिसांनी गळा आवळण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीत विरोधकांना आंदोलनाचा अधिकार आहे, पण हे सरकार पोलिसांचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. युवक काँग्रेस ही दडपशाही अजिबात सहन करणार नाही आणि आगामी काळात याविरोधात राज्यभर अधिक तीव्र संघर्ष उभा केला जाईल.”
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहूलराज पवार यांनी पोलिस प्रशासनाच्या कारवाईवर जोरदार हल्ला चढवला. “शिवराज मोरे यांच्यावर झालेला हल्ला हा भ्याडपणाचे लक्षण आहे. ज्या पोलिस अधिकाऱ्याने त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर तात्काळ निलंबनाची व गुन्हे दाखल करण्याची कारवाई झाली पाहिजे. दिल्लीतील शेतकरी आणि नागपुरातील युवक काँग्रेसच्या आंदोलकांवर ज्या प्रकारे लाठ्या चालवल्या जात आहेत, ते पाहता सामान्य जनतेने न्यायासाठी कोणाकडे जायचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.”
पंचायत समिती सदस्य संग्राम पवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. “राज्यात भाजपप्रणीत सरकार लोकशाहीची पायमल्ली करत हुकूमशाही पद्धतीने कारभार चालवत आहे. लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या तरुणांवर असा अमानुष हल्ला होत असेल, तर याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रातील जनता या जुलमी सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला.
या आंदोलनात पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहूलराज पवार, दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह सिद्धेश्वर शेटे, देवदास माने, पै. अक्षय सुर्वे, मुबीन पटेल, गणेश सूर्यवंशी, समीर इनामदार, दिगंबर महापुरे, नवतेज पवार, दीपक तांदळे, चैतन्य पाटील, नंदकुमार भोसले, शानूर देसाई, मुकुंद पाटील, रविराज पाटील, सतीश कदम, तानाजी भंडारे, दिग्विजय जमाले, प्रतीक निकम, नितीन पाटील या मुख्य पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. परिसरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.



