पांचगणी न्यूज नेटवर्क/ प्रमोद रांजणे
पाचगणी: शंभर वर्षांची गौरवशाली आणि दैदिप्यमान परंपरा लाभलेल्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, राजपुरीच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त सध्या विविध उपक्रमांची रेलचेल सुरू आहे. याच सुवर्णमयी वर्षानिमित्त केवळ उत्सव साजरा न करता, भावी पिढीला निसर्गाची अनमोल भेट देण्यासाठी शाळेने पर्यावरण संवर्धनाचा एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. शनिवार, दिनांक २७ जून २०२६ रोजी शाळेतील बालचमूंनी तब्बल २१०० देशी वृक्षांचे सीडबॉल तयार करून परिसरात त्याचे विखुरण केले आणि पर्यावरण रक्षणाचा नवा आदर्श समाजासमोर ठेवला.
सन १९२५ मध्ये स्थापन झालेल्या या ऐतिहासिक शाळेला २०२५ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या शतक महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक उपक्रम राबवून शाळेने सातारा जिल्ह्यात आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. या संपूर्ण महोत्सवाची सांगता अधिक अर्थपूर्ण आणि निसर्गाभिमुख करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध देशी प्रजातींच्या वृक्षांच्या बिया गोळा करून २१०० सीडबॉल (बियांचे गोळे) तयार केले होते.
नुकत्याच झालेल्या पावसाच्या तृप्त करणाऱ्या आगमनानंतर, शनिवारी राजपुरी येथील ‘अमृत सरोवर’ आणि परिसरातील डोंगररांगांमध्ये हे सीडबॉल विखुरण्याचा अनोखा कार्यक्रम पार पडला. यावेळी छोट्या-छोट्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने हे सीडबॉल हवेत उधळले. “एक सीडबॉल… उद्याचा हिरवागार जंगलाचा पाया” अशा गगनभेदी घोषणा देत विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
केवळ कागदावर पर्यावरण दिन साजरा न करता, प्रत्यक्ष कृतीतून लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धन, जैवविविधतेचे रक्षण आणि निसर्गाविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. आज लावलेले हे छोटेसे सीडबॉल भविष्यात राजपुरी परिसराला अधिक नयनरम्य आणि हिरवेगार बनवतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
शतक महोत्सवाच्या निमित्ताने शाळेने सामाजिक बांधिलकी जपत घेतलेल्या या हरित संकल्पाचे आणि चिमुकल्यांच्या या पर्यावरणपूरक प्रयत्नांचे पाचगणी परिसर तसेच संपूर्ण सातारा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातून आणि ग्रामस्थांकडून भरभरून कौतुक होत आहे. निसर्गाचे ऋण फेडणारा हा उपक्रम इतर शाळांसाठीही निश्चितच प्रेरणादायी ठरेल, अशा प्रतिक्रिया यावेळी उमटत आहेत.



