पांचगणी न्यूज नेटवर्क
जावळी: बेलोशी गावचे सुपुत्र आणि नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोपाळ बेलोशे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाच्या जावळी तालुका उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. पक्षासाठी त्यांनी केलेले निष्ठावंत कार्य आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना ही नवी जबाबदारी देण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर संपूर्ण तालुक्यासह विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गोपाळ बेलोशे हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांचे खंदे आणि कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. विकास सेवा सोसायटीच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपला पूर्ण वेळ पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी आणि जनसेवेसाठी समर्पित केला आहे. यापूर्वीही त्यांनी विविध संघटनांच्या माध्यमातून प्रशासकीय व सामाजिक पातळीवर यशस्वी काम पाहिले आहे. सध्या ते सातारा जिल्हा गटसचिव संघटनेचे उपाध्यक्ष तसेच रेशन धान्य दुकानदार संघटनेचे जावळी तालुका सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या याच तळागाळातील दांडग्या जनसंपर्काची पावती म्हणून पक्षाने त्यांच्या खांद्यावर ही महत्त्वाची धुरा सोपवली आहे.
निवडीची घोषणा झाल्यानंतर युवा नेते साहिलबाबा शिंदे यांच्या शुभहस्ते गोपाळ बेलोशे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना बेलोशे यांनी, “आदरणीय शशिकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जावळी तालुक्यात पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील घटकांपर्यंत पक्षाचे विचार पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू,” असा विश्वास व्यक्त केला.
या भव्य सत्कार सोहळ्याला प्रतापगड कारखान्याचे संचालक रामदास पार्टे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदीप पवार, जावळी बँकेचे संचालक चंद्रकांत गवळी, जावळी तालुका अध्यक्ष सचिन गोगावले, तसेच सचिन गोळे, मनस्वी अविनाश दुर्गावळे, सुनील दिवडे, सचिन जाधव, प्रवीण गुजर, नरेश पवार, दरेकर, रवी पारठे, तानाजी पवार, सतीश पवार, ऋषी शिंदे, गणेश निकम, सुधीर करंदकर, प्रकाश चव्हाण, मनोज गावडे, उमेश दुर्गावळे, दत्तात्रय बेलोशे, संदीप बंदल, विनोद यादव यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



