पांचगणी न्यूज नेटवर्क /प्रमोद रांजणे
पाचगणी (प्रतिनिधी): चौकटबद्ध अभ्यासाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव दिला, तर वर्गखोल्यांचे रूप कसे बदलू शकते, याचा अनोखा प्रत्यय पाचगणी येथील नामांकित ‘रीड अँड राईज स्कूल’मध्ये पाहायला मिळाला. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या ‘डिझाईन युवर क्लासरूम’ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीची उधळण करत चार भिंतींना केवळ रंगवले नाही, तर त्यांना शैक्षणिक आणि प्रेरणादायी स्वप्नांचे रूप दिले. या उपक्रमामुळे संपूर्ण शाळा जणू एखाद्या नयनरम्य कला-दालनात रूपांतरित झाली होती.
या रंगतदार स्पर्धेचे उद्घाटन सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट व सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फहम्मा सय्यद यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने थक्क झालेल्या फहम्मा सय्यद यांनी, सर्जनशीलता आणि संघभावना हीच आयुष्यातील खऱ्या यशाची गुरुकिल्ली असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मुक्तकंठाने कौतुक केले.
शाळेच्या प्राचार्या सौ. सना मोकाशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ सौंदर्यदृष्टी विकसित होत नाही, तर त्यांच्यात नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि परस्पर सहकार्याची भावना दृढ होते.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अत्यंत चुरशीने सहभाग नोंदवत आपल्या वर्गखोल्यांचा कायापालट केला. यात इयत्ता आठवीच्या वर्गाने आपल्या अफाट कल्पकतेच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला, ज्यासाठी वर्गशिक्षिका सौ. रोझी सिद्दीकी यांचे विशेष कौतुक करण्यात आले. इयत्ता सहावीच्या वर्गाने उत्कृष्ट कलाकुसर सादर करत द्वितीय क्रमांक मिळवून वर्गशिक्षिका सौ. झैनब सय्यद यांचा सन्मान मिळवला, तर इयत्ता सातवीच्या वर्गाने तृतीय क्रमांकावर आपले नाव कोरत वर्गशिक्षिका सौ. निलोफर पटवेकर यांच्या मार्गदर्शनाचा गौरव केला.
या उपक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी समन्वयक म्हणून सौ. सविता पोटघंटे, सौ. राबिया मोमीन, सौ. ऐश्वर्या खरात आणि श्री. कुणाल कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या प्रत्येक वर्गातून स्वच्छता, शिस्त, सकारात्मकता आणि शिक्षणाची नवी दिशा स्पष्टपणे दिसत होती. रीड अँड राईज स्कूलच्या या कौतुकास्पद उपक्रमाची संपूर्ण पाचगणी परिसरात आणि पालकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.



