Home » पांचगणी » लाल मातीतील हिरा चमकला! मुंबई जिल्हा कुस्ती स्पर्धेत आंब्रळच्या स्वरूप आंब्राळेने पटकावले सुवर्ण यश; गावाचा केला सन्मान

लाल मातीतील हिरा चमकला! मुंबई जिल्हा कुस्ती स्पर्धेत आंब्रळच्या स्वरूप आंब्राळेने पटकावले सुवर्ण यश; गावाचा केला सन्मान

पांचगणी न्यूज नेटवर्क

​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील कुस्तीची समृद्ध परंपरा आणि लाल मातीशी असलेले घट्ट नाते पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आंब्रळ (ता. महाबळेश्वर ) येथील सुपुत्र कु. स्वरूप सुनील आंब्राळे याने आपल्या अफाट कौशल्याच्या जोरावर मुंबई जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण यश संपादन केले. त्याच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे आंब्रळ गावासह संपूर्ण महाबळेश्वर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

​मुंबईत पार पडलेल्या या अत्यंत चुरशीच्या आणि मानाच्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत राज्यभरातून नामांकित पैलवानांनी सहभाग घेतला होता. मात्र, स्वरूपने आपल्या उत्कृष्ट पकडी, चपळाई, आक्रमक डावपेच आणि समोरच्या प्रतिस्पर्ध्याची चाल ओळखून लावलेल्या पणाला दाद देत अंतिम फेरीत प्रतिस्पर्ध्याला धूळ चारली. कडक शिस्त, रोजचा कठोर सराव, जिद्द आणि कुस्तीप्रती असलेले समर्पण याच्या जोरावर स्वरूपने हे यश संपादन केले आहे.

​स्वरूपच्या या यशामुळे आंब्रळ गावात प्रचंड उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, गावकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. कुस्तीच्या मैदानात महाबळेश्वरच्या मातीचा दरवळ कायम ठेवणाऱ्या या बालमल्लावर सर्व स्तरांतून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यात राज्य व राष्ट्रीय पातळीवरही तो महाराष्ट्राचे आणि महाबळेश्वरचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींमधून व्यक्त होत आहे.

​त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामस्थ मंडळ आंब्रळ आणि ग्रामपंचायत आंब्रळ यांच्या वतीने स्वरूपचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला. भविष्यातील कुस्तीच्या वाटचालीसाठी, उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याला ग्रामस्थांच्या वतीने उदंड यश आणि प्रगतीच्या मनापासून शुभेच्छा देण्यात आल्या.

Facebook
X
WhatsApp
Telegram

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers