पाचगणी न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी
वाई: एसटी बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशांची गर्दी आणि गडबडीचा फायदा घेऊन दागिने लंपास करणाऱ्या टोळीला वाई पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. वाई एसटी बस स्थानकावर अवघ्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या २ तोळे वजनाच्या सोन्याच्या मंगळसूत्र चोरीचा छडा लावण्यात वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) शाखेला पूर्ण यश आले आहे. याप्रकरणी सुरूर येथील एका महिला चोरट्याला अटक करण्यात आली असून, तिच्याकडून अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईमुळे प्रवाशांमधून, विशेषतः महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ९ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी दिशा निखिल कळंबे या श्रीवर्धन ते सातारा जाणाऱ्या बसमध्ये वाई एसटी स्टँडवरून चढत होत्या. बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा उठवून अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील २,५०,०००/- रुपये किमतीचे २ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अत्यंत चलाखीने चोरले होते. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच कळंबे यांनी वाई पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गु.र.नं १६५/२०२६ बीएनएस कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपास पथकातील पोलीस कॉन्स्टेबल विक्रम धोत्रे यांनी वाई एसटी स्टँड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज अत्यंत बारकाईने तपासले. या तपासणीत एक महिला बस स्थानक परिसरात संशयास्पदरित्या वावरत असल्याचे पोलिसांच्या नजरेस पडले. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेने या संशयित महिलेचा माग काढण्यास सुरुवात केली.
दरम्यान, तपासाला गती मिळालेली असतानाच, ही संशयित महिला पुन्हा एकदा एसटी स्टँड परिसरातच येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांच्या गोपनीय बातमीदाराने दिली. माहिती मिळताच पोलिसांनी कोणतीही वेळ न दवडता एसटी स्टँड परिसरात सापळा रचला आणि संबंधित महिलेला ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलेची कसून चौकशी केली असता, तिने आपले नाव जयपाल लखन पवार (रा. पारधी वस्ती, सुरूर, ता. वाई) असे सांगितले. पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता, तिने दिशा कळंबे यांचे मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी माननीय न्यायालयाची पूर्वपरवानगी घेऊन संशयित आरोपी जयपाल पवार हिला अटक केली. तसेच तिच्याकडून चोरीला गेलेले २,५०,०००/- रुपये किमतीचे २ तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र सुखरूप हस्तगत केले.
सदरची धडक आणि यशस्वी कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर आणि वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील साळुंखे यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम धोत्रे, नितीन कदम, हेमंत शिंदे, श्रावण राठोड तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल पूजा गोळे आणि स्नेहल सोनवणे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली. अवघ्या ४८ तासांत गुन्ह्याचा छडा लावून मुद्देमाल जप्त केल्याबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या संपूर्ण टीमचे विशेष अभिनंदन केले आहे.



