पांचगणी न्यूज नेटवर्क / चंदू भोई
वाई : सिद्धनाथवाडी परिसरातील सोसायट्या आणि शेतीपंपांच्या मोटारींची केबल चोरी करून त्यातील तांबे विकणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांच्या वाई पोलिसांनी आवळल्या मुसक्या आहेत. संशयित आरोपींना तांब्याची तार विकताना रंगेहात पकडून त्यांच्याकडून गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
तारांगण सहकारी गृहनिर्माण सोसायटी, सिद्धनाथवाडी (वाई) येथील पार्किंगमध्ये बसवलेली सुमारे १०० मीटर लांबीची कॉपर केबल वायर चोरट्यांनी लंपास केली होती. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे आणि तपास पथकाने तात्काळ शोध मोहीम सुरू केली.
तंत्रज्ञानाचा वापर आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन संशयित तरुण पसरणी रोडवर तांब्याची तार विकण्यासाठी येणार असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या समीर सुरेश तुपे (वय २०) आणि राहुल दादाराव पांचांगे (वय २४, दोघे रा. गुरेबाजार झोपडपट्टी, सिद्धनाथवाडी, वाई) या दोघांना पोलिसांनी पाठलाग करून तांब्याच्या तारेसह ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी तारांगण सोसायटीच्या पार्किंगमधील कॉपर केबल चोरल्याचे आणि ती जाळून त्यातील तांब्याची तार विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.
ही धडक कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वाईचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे, पोलीस अंमलदार नितीन कदम, विक्रम धोत्रे, हेमंत शिंदे, विशाल शिंदे, मारोती लोलापोड आणि उमेश लोखंडे यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार लोलापोड करत आहेत.



