पांचगणी न्यूज नेटवर्क
वाई : वाई तालुक्यातील व्याहळी कॉलनी हद्दीत जोर ते वाई मार्गावरील काळुबाई मंदिराजवळ शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात वाहन चालकाचा मृत्यू झाला असून एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे 3.32 वाजण्याच्या सुमारास महिंद्रा कंपनीची एमएच 14 केयू 1018 क्रमांकाची चारचाकी जोरहून वाईकडे येत होती. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या दक्षिण बाजूच्या चरात जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की वाहनाचे मोठे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनात अडकलेल्या महिला प्रवाशाला बाहेर काढून तातडीने 108 रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमी महिलेची ओळख चित्रा आनंदा फरांदे (रा. बोरीव, ता. वाई) अशी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, वाहनाखाली अडकलेल्या एका व्यक्तीचा गावच्या ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. मोबाईलच्या आधारे त्याची ओळख अभिजित श्रीनाथ यादव (रा. खडकवासला, पुणे) अशी पटली. अपघाताची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली.
घटनास्थळाच्या पंचनाम्यात अपघातस्थळापूर्वी सुमारे 50 मीटरपर्यंत ब्रेकचे ठसे आढळून आले. प्राथमिक तपासात चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवल्याने अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात चालक अभिजित यादव यांचा मृत्यू झाला असून चित्रा फरांदे या गंभीर जखमी झाल्या आहेत.
वाई पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.



